नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): धोकेदायक बनलेल्या यशवंत मंडईत पावसाळ्यात जीवितहानी झाल्यास येथील भाडेकरूंना जबाबदार धरले जाणार असून महापालिका जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्टीकरण नोटिसीद्वारे देण्यात आले आहे. तसेच ग्राहकांची जीवितहानी झाल्यास त्यासदेखील भाडेकरूना जबाबदार धरले जाणार आहे.
रविवार कारंजावरील यशवंत मंडई पाडून येथे वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रथम स्मार्ट सिटी कंपनीने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये बहुमजली पार्किंग उभाण्याचा प्रकल्प अव्यवहार्य ठरविला. त्यामुळे इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. इमारतीमधील २४ गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयात अंतिम सुनावणीत महापालिकेच्या बाजूने निकाल देताना भाडेकरूंची याचिका फेटाळली.
दरम्यान, पावसाळा सुरू होणार असून इमारत कोसळल्यास त्यातून जीवित व वित्तहानी झाल्यास महापालिका जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
अशी आहे अंतिम नोटीस:
यशवंत मंडई इमारत धोकेदायक असल्याचा रिपोर्ट मे. सिव्हिल टेक वकर्मवीर बाबूराव ठाकरे इंजिनिअरिंग कॉलेजने सादर केल्यावर जुलै २०२३ मध्ये जागा खाली करण्याची नोटीस दिली. मात्र १७ गाळेधारकांनी इमारत खाली केली नाही. त्यामुळे भविष्यात दुर्घटना घडून गाळ्यांमध्ये येणारे ग्राहक, नागरिक, गाळ्यांमधील कर्मचारी तसेच इतर कोणाच्याही जीविताला धोका झाल्यास किंवा वित्तहानी झाल्यास महापालिका जबाबदार राहणार नसल्याबाबत महापालिकेने सांगितले आहे.
भूमिकेबाबत आश्चर्य:
धोकादायक घरांमधील कुटुंब बाहेर पडत नसल्यास महापालिकेला कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे. महापालिका पाणी किंवा वीजपुरवठा खंडित करू शकते किंवा पोलिसांच्या मदतीने बाहेर काढू शकते, मात्र येथे महापालिकेने केवळ गाळेधारकांना इशारे दिल्याने या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.