नाशिक (प्रतिनिधी): महिला वर्गाला अनेक ठिकाणी चोरट्यांनी फसवेगिरी करून सोने लांबविल्याचे प्रकार घडत आहेत.
नांदूरशिंगोटे येथील निमोण नाक्यावर कारची लिफ्ट घेऊन तळेगावकडे जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील तेरा ग्रॅमची सोन्याची पोत कारमध्ये बसलेल्या महिलेने लांबवल्याची घटना नुकतीच घडली.
सुनीता शिवदास गिते (रा. सोनोशी, ता. संगमनेर) या भावाच्या वर्षश्राद्धासाठी जात होत्या. संगमनेरवरून त्या नांदुरशिंगोटे येथील निमोण नाक्यावर उतरून खासगी वाहनांची वाट पहात होत्या. यावेळी एका चॉकलेटी रंगाच्या कारचालकाने त्यांना लिफ्ट दिली. कारमध्ये एक महिलाही बसलेली होती.
निमोण रस्त्याने कार जात असताना काही अंतरावर सुनीता यांनी कारच्या दरवाजाची काच खाली घेतली. मात्र, कारमधील महिलेने महिलेला काच खाली न घेण्याचे सांगत तिच्या हाताने पुन्हा कारची काच खाली घेतली. कारमधील महिलेने नकळत सुनीता यांच्या गळ्यातील तेरा ग्रॅम वजनाची पोत लांबवली.
सुनीता या कारमधून उतरल्यानंतर काहीवेळानंतर त्यांना आपली पोत चोरी गेल्याचे लक्षात आले. मात्र, तोपर्यंत कार निघून गेली होती. सुनीता यांनी श्राद्धाचा कार्यक्रम उरकून वावी पोलिस ठाण्यात कारचालक व कारमधील अज्ञात महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.