शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन !
मुंबई। दि ९ जून २०२५: गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे, आणि किमान 15 जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. यामुळे 14 जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, आणि खानदेशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. या दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन ते 45 अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे, तर विदर्भातील बऱ्याच भागात कमाल तापमान 40 अंशापेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि खानदेशातील अनेक भागात कमाल तापमान 40 अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज देखील आहे.
14 जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक आणि मान्सूनचा पाऊस अपेक्षित नाही. पाऊस हा प्रामुख्याने दुपार नंतर आणि मेघ गर्जनेसह काही भागातच पडेल, ज्याची शक्यता या आठवड्याच्या सुरुवातीला दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य-महाराष्ट्रात अधिक राहील. तुलनेत राज्यातील इतर भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
या दरम्यान कमाल तापमान अधिक राहणार असल्यामुळे आणि सार्वत्रिक मान्सूनचा पाऊस अपेक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790