नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणामधून पाणी सोडण्यास आमदार- खासदार, राजकिय नेते आणि शेतकऱ्यांचा विरोध झुगारून अखेरीस मध्यरात्री पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे. तर आज म्हणजेच रविवारपासून गंगापूर, मुकणे आणि कडवा या धरणातूनही पाणी सोडण्यात येणार आहे.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने यासंदर्भात चार आठवड्यांपूर्वी आदेश दिले होते. त्यानंतर नाशिक आणि अहमदनगर येथून राजकीय विरोध सुरू झाला होता तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. मात्र, महामंडळाच्या आदेशाला स्थगिती मिळाली नाही. नाशिक जिल्ह्यात यंदा जेमतेम ६० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे आतापासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. शेतीला योग्य वेळी पाणी मिळाले नाही तर शेती उद्ध्वस्त होईल अशी भीती आहे.
त्यातच पाणीटंचाई असताना नाशिक आणि नगरमधून ९ टीएमसी पाणी सोडल्यास जायकवाडीपर्यंत ६ टीएमसी पाणी पोहोचणार असून ३ टीएमसी लॉसेस आहेत त्यामुळे नाशिक आणि नगरमधून पाणी सोडण्यास विरोध होत होता.
दरम्यान, शुक्रवारी (दि.२४) रात्री जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दारणा धरण समूहातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार मध्यरात्री २०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी पात्रावरील कालव्यांच्या फळ्या काढण्याचे काम सुरू झाल्यानंतर हळूहळू पुढील विसर्ग करण्यात येणार आहे. दारणा धरण समूहातून २.६४३ टीएमसी आणि गंगापूर धरणातून ०.५ म्हणजे अर्धा टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश आहेत.
दारणा पाठोपाठ रविवारी गंगापूर, मुकणे आणि कडवा या तीन धरणांमधून पाणी सोडण्यात येणार आहे.
गंगापूर आणि मुकणे धरणातून नाशिक शहराला प्रामुख्याने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
गंगापूर कडवा, मुकणे जलाशयातून रविवारी (दि. २६) सकाळी प्रथम पाचशे क्युसेस विसर्ग करण्यात येणार असून, टप्याटप्याने विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रातील आणि लगतही वस्तू, साहित्य, मोटारी, वाहने नदीपात्राबाहेर काढून घ्यावेत तसेच नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये. नदीपात्राजवळील धार्मिकस्थळी, पर्यटनस्थळी नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.