नाशिक: आगामी सणउत्सवांच्या पार्श्वभूमीवर दक्षता बाळगा! कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन अपेक्षित

नाशिक (प्रतिनिधी): आगामी गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद यासह सणउत्सवांच्या पार्श्वभूमीवर कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्‌भवू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यासह दक्षता बाळगावी यासाठीच्या सूचना अपर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी दिल्या.

गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयात नाशिक परिक्षेत्राची आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. सिंगल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली.

या बैठकीला परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर-पाटील, नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, नाशिक ग्रामीणचे अधीक्षक शहाजी उमाप, जळगावचे अधीक्षक एम. राजकुमार, धुळ्याचे अधीक्षक संजय बारकुंड, नंदूरबारचे अधीक्षक पी.आर. पाटील यांची उपस्थिती होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कार भाड्याने घेऊन परस्पर विक्री; दोन संशयित अंबड गुन्हे शाखेच्या जाळ्यात

तर, अहमदनगरचे अधीक्षक राकेश ओला हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. प्रारंभी, जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या पोलीस नियोजन व बंदोबस्ताची माहिती देण्यात आली.

तसेच, यंदाच्या गणेशोत्सवात शहर-जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या तयारीचाही आढावा घेतला. त्याचप्रमाणे, सणउत्सवांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईचीही माहिती यावेळी घेण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एसटी ‘हिरकणी’ बसला आग; १५ प्रवासी सुखरूप

यावेळी अपर पोलीस महासंचालक डॉ. सिंगल यांनी, आगामी सणसमारंभाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्तासह प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देत, परिक्षेत्रात करण्यात आलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले.

गणेश विसर्जन मिरवणुक नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी मंडळांशी सुसंवाद राखून मिरवणुकीत अंतर राहणार नाही याची काळजी घ्यावी. जादा पोलीस बंदोबस्त तैनात करताना त्यांचे नियोजन करावे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या बसला कानपूरजवळ अपघात; एकाचा मृत्यू

बंदोबस्तावरील पोलिसांवर अतिरिक्त ताण येऊ नये, त्यांना वेळेवर फुडपॅकेट मिळतील याची व्यवस्था करावी, मिरवणूक मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांची बारकाईने मॉनिटेरिंग करावी, तसेच उत्सव काळात होणाऱ्या गर्दीवर निगराणी ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करावा, साेशल मीडियावर वॉच ठेवून आक्षेपार्ह संदेश व्हायरल होऊन सामाजिक सलाेखा बिघडण्याची शक्यता असते, त्याबाबत सायबर सेलने दक्षता बाळगावी यासह विविध सूचना डॉ. सिंगल यांनी केल्या.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790