नाशिक: पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; आयशरसह ६३ लाखांचा गुटखा जप्त

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): वणी पोलिसांनी गुटखा तस्करांविरुद्ध धडाकेबाज मोहीम सुरूच ठेवली आहे. अशातच वणी येथील जऊळके वणी रस्त्यावर ४८ लाखांच्या मुद्देमालासह दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वणी पोलिस ठाण्याचे एपीआय नीलेश बोडखे यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली असता त्याआधारे त्यांनी आपल्या वणी पोलिस ठाण्यातील पथकाला कारवाईच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आयशर क्रमांक एमएच १८ बीजी ०२४० जऊळके वणी रस्त्यावर आढळून आले असता सदर वाहनाला पोलिसांनी थांबविण्याच्या सूचना दिल्या. मात्र, वाहनचालकाने आयशर पळविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नाकाबंदीने वाहनाला वणी पोलिसांना पकडण्यात यश आले.

यावेळी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेत चौकशी केली असता गाडीत गुटखा आढळून आला. त्यानंतर वाहनासह संशयित आरोपींना वणी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यानंतर पोलिसांनी वाहनातील प्रतिबंधित गुटख्याचे मोजमाप केले असता ४८ लाख २० हजार ४६० रूपये किंमतीचा मुद्देमाल वाहनात आढळून आला. त्यानंतर वणी पोलिसांनी आयशरसह एकूण ६३ लाख २० हजार ४६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल केला.

दरम्यान, या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले असून या कारवाईबद्दल नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी वणी पोलिसांचे अभिंदन केले आहे. तसेच या कारवाईची पाहणी करण्यासाठी कळवण उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबळे हे वणी पोलिस ठाण्यात उपस्थित होते. तर या कारवाईत एपीआय निलेश बोडखे, पीएसआय विजय कोठावळे, पो.ह. माधव साळे, पो.कॉ. धनंजय शिलावटे, पो.शि.विक्रम कासार, बाळासाहेब हेंगडे, गोपनीयचे निलेश सावकार, पो.कॉ राहुल आहेर, क्राईमचे युवराज खांडवी, मुजावर देशमुख, पो.ह. हरिश्चंद्र चव्हाण, मच्छिंद्र पीठे यांनी सहभाग घेतला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790