नाशिक (प्रतिनिधी): वडांगळी, जोगलटेंभी (ता. सिन्नर ) येथील गोदावरी दारणा संगमाजवळ देवाचे पाणी चेंबूत आणताना सोनगिरीच्या दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पुतण्याला वाचविण्यासाठी गेलेले काका बुडाले आहे. मंगळवारी(ता.10) सकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.
बुडलेल्या काका पुतण्याचा गोदावरी नदीतून शोध घेऊन मुतदेह बाहेर काढण्यात आले. सोनगिरी (ता. सिन्नर) येथील गावात श्रावणात अन् गणेशोत्सव काळात घरोघरी चेंबूच्या साहाय्याने ठरलेल्या प्रमाणे गोदावरी नदी वरून देवाला पाण्याचा अभिषेक करण्याची पंरपरा आहे. हा पाण्याचा चेंबू शेतकरी शिवनाथ मधूकर लहाने ( वय 48) व विठ्ठल गोरख लहाने (वय 14) यांच्या कुटुंबा कडे आला.
त्यामुळे दोघे काका पुतणे जोगलेटेंभीला गंगेचे पाणी आणण्यासाठी गेले. सकाळी सहाच्या सुमारास जोगलेटेंभीच्या गोदा दारणा संगमाजवळ आले. महादेव मंदिराजवळ मोटारसायकल लावली. त्यानंतर विठ्ठल लहाने महादेव मंदिराजवळील गोदापत्रात अंघोळ साठी गेला. मात्र विठ्ठलचा घाटाजवळ पाण्याच्या वेगाने तोल गेला. त्यावेळी शिवनाथ लहाने यांनी विठ्ठलला वाचविण्यासाठी गोदावरी नदीत उडी घेतली.
मात्र दोघेही पाण्याचा वेगाने गोदावरी नदी पात्रात बुडाले. सकाळची वेळ असल्या कारणाने संगमाजवळ कोणी आले नव्हते. भल्या सकाळी गंगेचे पाणी आणण्यासाठी गेलेले काका पुतणे आले नाही. त्यामुळे लहाने परिवारातील सदस्य संगमाकडे आले. त्यावेळी दोघांचे कपडे आणि गंगेच्या पाण्याचा चेंबू दिसला. दोघेही गोदावरी नदी पात्रात बुडाल्याचे समजले. त्यानंतर शोधकार्य सुरू झाले.
शोध मोहिमेच्या पथकाने दुपारी साडेबाराला विठ्ठल लहाने याचा बुडलेल्या ठिकाणी मुतदेह व दीड वाजेच्या सुमारास शिवनाथ लहाने यांचा अंगातील कपड्यासह मुतदेह सुमारे दोन फुट अंतरावर गोदावरी पात्रातून बाहेर काढण्यात यश आले आहे.विठ्ठल लहाने नायगावच्या जनता विद्यालयात सातवीला शिकत होता. सोनगिरीला दुपारी साडे चारच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात दुदैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.