उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकीलपदी फेरनियुक्ती  

मुंबई (प्रतिनिधी): उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून पराभतू झालेले भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांची राज्यातील महायुती सरकारनं पुन्हा एकदा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र काँग्रेसने निकम यांच्या नियुक्तीस तीव्र आक्षेप घेतला आहे. सरकारने तातडीनं या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ॲड. उज्वल निकम निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढविली. मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी निकम यांना पराभूत केलंय. यांनतर आता उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते न्याय विभागाच्या कक्षेत पुन्हा दाखल झालेत.

लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर अवघ्या 12 दिवसांतच सरकारने त्यांनी पुन्हा राज्याच्या विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती केली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी निकम यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी हा राजीनामा राज्य विधी आणि न्याय विभागाकडे सोपावला होता. त्यामुळे निकम यांच्याकडील असलेले प्रलंबित खटले सरकार कोणाला सोपवणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. राज्य शासनाने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम २४ (८) नुसार उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून फेरनियुक्ती केलीय. त्यामुळे आता राज्यभरात विविध जिल्ह्यातील प्रकरणांत उज्वल निकम पुन्हा काम पाहणार आहे.

उज्ज्वल निकम यांनी यापूर्वी देखील विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आहे. मुंबई बॉम्बस्फोट, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात त्यांनी सरकार पक्षाच्या वतीनं युक्तिवाद केला होता. या खटल्यांमुळं त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790