नाशिक (प्रतिनिधी): वर्षाच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (दि.३१) त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे सुमारे २० हजाराहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. गर्दीचा ओघ सकाळी कमी होता. परंतु, दुपारी बारा वाजेनंतर तो वाढू लागल्यावर सायंकाळपर्यंत गर्दी वाढतच होती.
नूतन वर्षानिमित्त दर्शनासाठी बुधवारी (दि.१) भाविकांची अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. बहुतेक भाविकांनी दर्शन सुलभ होण्यासाठी व पुजेसाठी मंगळवारीच येथे हजेरी लावली आहे. मंदिर दर्शनासाठी नेहमीप्रमाणे सकाळी साडेपाच ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले राहिल.
माजी राष्ट्रपती कोविंद परिवारासह दर्शनासाठी:
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दुपारी दोनला परिवारासोबत दर्शनासाठी दाखल झाले. कोठी हॉलजवळ विश्वस्त मनोज थेटे, कैलास घुले व रुपाली भुतडा यांनी त्यांचे स्वागत केले. श्रींची प्रतिमा, रुद्राक्षमाळा व शाल देऊन सत्कार करण्यात आला. मंदिरात त्यांनी अभिषेक पूजा केली. सर्वांना आनंद व सुख लाभो अशी प्रार्थना केल्याचे ते म्हणाले. दरम्यान, कोविंद यांची पूजा सुरु असल्याने दर्शन रांगा अडवण्यात आल्याने भाविकांची गैरसोय झाली.