त्र्यंबकेश्वर: कुंभमेळ्याची नियोजित विकास कामे समन्वयाने वेळेत पूर्ण करावीत- मुख्य सचिव राजेश अग्रवाल

नाशिक। दि. ६ एप्रिल २०२६: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेली पायाभूत सोयीसुविधांची सर्व विकास कामे निर्धारित वेळेत, उच्च दर्जासह संबंधित विभागांनी समन्वयातून पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिल्या. त्र्यंबकेश्वर येथे रविवारी मुख्य सचिव अग्रवाल यांनी विविध विकास कामांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्य सचिव श्री. अग्रवाल म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना सुरक्षित, स्वच्छ व सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. नाशिक–त्र्यंबकेश्वर सहा पदरी रस्त्याच्या कामांना गती देण्यासोबतच गुणवत्तेवर भर देण्यात यावा. कुशावर्त कुंडातील पाण्याची नियमित स्वच्छता, कुंडातील कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करावी. कुशावर्त कुंड परिसरातील विकास कामे करताना धार्मिक व ऐतिहासिक वारशाचे महत्त्व लक्षात घेत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे. पर्वणी काळात भाविकांच्या मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कुशावर्त परिसरातील स्वच्छता व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पुढील दोन दिवस ढगाळ वातावरणाचा अंदाज

बिल्वतीर्थ परिसरात सुरू असलेल्या नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. पाणी शुद्धीकरण प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहणार नाही यासाठी तांत्रिक बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करावे. तसेच सिंचन विभागाने घाट, प्रयाग तीर्थ येथे आवश्यक पायाभूत सुविधा तातडीने पूर्ण कराव्यात.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भाविक व पर्यटकांसाठी सुविधा अधिक दर्जेदार करण्याचे नियोजन करावे- मुख्य सचिव राजेश अग्रवाल

गोदावरी नदी प्रवाही राहण्यासाठी बेझे धरणावरील गौतमी गोदावरी धरण ते त्रंबकेश्वर उपसा सिंचन योजनेची कामे गतीने नियोजित वेळेत पूर्ण करावीत. तसेच कुंभमेळा कालावधीत जलपुरवठा यंत्रणा सक्षम व अखंडित ठेवण्यावर भर देण्यात यावा. अशा सूचनाही मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी दिल्या. यावेळी उपस्थितांनी आपापल्या विभागामार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केली कुंभमेळा विकास कामांची पाहणी

यावेळी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेश औटी, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता राहुल पाटील, नवनाथ सोनवणे, मनोज ढोकचौळे, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, तहसीलदार गणेश जाधव, त्रंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, उपविभागीय अभियंता अभिजित शेलार, उमाकांत कुमावत, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, सहाय्यक वनरक्षक (वन्यजीव संरक्षण) प्रशांत खैरनार, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता योगेश्वर पाटील आदींसह विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790