नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): अन्न व औषध प्रशासनाने त्र्यंबकेश्वर येथील तीन मिठाई दुकानांवर कारवाई करीत सुमारे ५५ हजार रुपये किमतीची १३५ किलो मिठाई नष्ट केली. प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
धार्मिकस्थळांवर होणारी गर्दी लक्षात घेता भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई करण्याची मोहीम अन्न व औषध प्रशासनाने हाती घेतली आहे. सहआयुक्त संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त उदय लोहकरे, मनीष सानप यांच्या उपस्थितीत अन्नसुरक्षा अधिकारी गोपाल कासार, योगेश देशमुख, प्रमोद पाटील, अश्विनी पाटील यांनी त्र्यंबकेश्वर येथील मंदिर परिसरातील मिठाई दुकानांची अचानक झाडाझडती घेतली.
यात काही ठिकाणी भेसळ आढळून आली. यात भोलेनाथ स्विट्स दुकानातून ३७ हजार ४४० रुपये किमतीचा ७८ किलो कुंदा, नित्यानंद पेढा सेंटर दुकानातून ६ हजार ६०० रुपये किमतीचा २२ किलो स्विट हलवा तसेच ६ हजार ६०० रुपये किमतीचा १३ किलो. हलवा, भोलेहर पेढा प्रसाद भंडार दुकानातून पेढे करण्यासाठी वापरात येणारा मावासदृश अन्नपदार्थाचा साठा जप्त केला.
नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत:
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेली मिठाई नाशवंत असल्याने नगर परिषदेच्या घंटागाडीत टाकून कचरा डेपोमध्ये नष्ट करण्यात आली. नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अहवाल आल्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. जनतेने व भाविकांनी धार्मिकस्थळी प्रसाद म्हणून पेढे, बर्फी, मिठाई खरेदी करताना ते दुधापासून बनविली असल्याबाबत खात्री करून खरेदी करण्याची दक्षता घ्यावी. तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थासंदर्भात तक्रार असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन नारागुडे यांनी केले आहे.