मोठी बातमी: राज्यभरात इंधनपुरवठा ठप्प, मुंबईतील २१० पेट्रोलपंप रात्रीपर्यंत बंद पडणार?

मुंबई (प्रतिनिधी): केंद्र सरकारविरोधात ट्रक-टँकर चालकांनी पुकारलेल्या संपाचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत. यामुळे राज्यातील इंधनपुरवठ्यावर ब्रेक लागला आहे. याचा परिणाम मुंबईतही दिसू लागले आहेत. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील २१० पैकी निम्मे पंप बंद होण्यास सुरुवात झाली आहे. रात्रीपर्यंत पुरवठा सुरू न झाल्यास सर्व पंप ठप्प होणार, अशी माहिती पेट्रोल पंप मालक असोसिएशनने दिली आहे.

१२ जिल्ह्यांत होणारा इंधनपुरवठा ठप्प:
केंद्र सरकारने नव्याने केलेला रस्ते अपघात सुरक्षा कायदा जाचक व अन्यायकारक असल्याचे सांगत त्याच्या निषेधार्थ मनमाडनजीक पानेवाडी, नागापूर परिसरात असलेल्या तेल कंपन्यांच्या चालकांनी संपाचे अस्त्र उपसल्याने सोमवारी तीनही कंपन्यांतून एकही टँकर इंधन भरून बाहेर पडू शकला नाही. या संपामुळे मनमाड परिसरातील तेल प्रकल्पातून राज्यातील तब्बल १२ जिल्ह्यांत होणारा इंधनपुरवठा ठप्प झाला असून, इंधनटंचाईचे संकट ओढवले आहे.

केंद्राच्या नव्या कायद्याप्रमाणे आता इंधन टँकर वा ट्रकचा अपघात झाल्यास आणि चालक अपघातस्थळावरून पळून गेल्यास चालकाचा जामीन न होता थेट दहा वर्षे तुरुंगवास व ७ लाख रुपये दंड अशी तरतूद असल्याचे टँकर चालकांचे म्हणणे आहे. याला टँकरचालकांनी तीव्र विरोध दर्शविला असून, हा कायदा मागे घेण्यासाठी टँकरचालकांनी सोमवारी सकाळी संपाचे हत्यार उपसले. या आंदोलनाला टँकरमालकांनीही पाठिंबा दिला. यामुळे पानेवाडी, नागापूर येथील हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या तीनही कंपन्यांतून राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये दररोज सुमारे दीड हजार टँकर भरून जातात.

सोमवारी नेहमीप्रमाणे तिन्ही कंपन्यांत इंधन टँकर भरण्याचे काम सुरू होण्यापूर्वी चालकांनी आदल्या दिवसापासून इंधन भरण्यासाठी आलेल्या टँकरचालकांना टँकर भरून कंपनीतून रवाना केले. अवघे पाच-सहा टँकर भरून झाल्यावर या टँकरचालकांनी अचानक काम बंदचा पुकारा केला. केंद्र सरकार, मोदी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत त्यांनी कोणत्याही कंपनीतून एकही टँकर भरून जाऊ दिला जाणार नाही, असा पवित्रा घेतला. टँकरचालक संघटनेचे सर्वच पदाधिकारी, सभासद या संपात सामील झाले.

कंपनी प्रशासनाचे प्रयत्न:
संप मागे घेण्याबाबत टँकर चालकांना कंपनी प्रशासनाने वारंवार विनंती केली. बीपीसीएल कंपनीत मुख्य प्रबंधक प्रशांत खर्गे यांनीही टँकरचालक, मालक यांच्याशी चर्चा केली. त्यांच्यासह टँकरमालक नाना पाटील, संजय पांडे, मुकेश ललवाणी, फंटू ललवाणी, टँकर चालक अनिल पगार, अनिल पवार, कैलास टेमगिरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. मात्र काही तोडगा निघाला नाही. अशाच बैठका इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियममध्ये अधिकारी मीना, बर्मन यांनीही घेतल्या. पण, केंद्राने कायदा मागे घेतला तरच संप मागे घेऊ, या भूमिकेवर आंदोलक ठाम राहिले. परिणामी, दररोज दीड हजार टँकर भरणाऱ्या तेल कंपन्यांतून सुरुवातीचे पाच-सहा टँकर वगळता एकही टँकर रवाना झाला नाही.

७५ लाख लिटर इंधन ठप्प:
मनमाड नजीक असलेल्या तीन महत्त्वाच्या इंधन कंपन्यांतून दररोज हजारावर टँकरमधून ७५ लाख लिटर पेट्रोल-डिझेल राज्यभरात जाते. महिनाअखेरीस तिन्ही कंपन्यांतून १२००ते १५०० टँकर भरून जातात.

हे जिल्हे प्रभावित:
नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, अकोला, बुलढाणा, नंदुरबार, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी व नांदेड.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790