आजच्या थोडक्यात बातम्या. दि. ३१ जानेवारी २०२४

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

बाबाज थिएटर्सतर्फे उद्या हिंदी ‘क्लासिक्स’, मान्यवरांचा कृतज्ञता सन्मानाने गौरव
नाशिक: बाबाज थिएटर्सतर्फे गुरुवारी (दि. १) ‘हिंदी क्लासिक्स’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुल येथे सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात शहरातील सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा कृतज्ञता सन्मानाने गौरव केला जाईल, कार्यक्रमाची संकल्पना बाबाजचे अध्यक्ष प्रशांत जुन्नरे यांची आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

अॅक्टिव्ह लेडिज ग्रुपतर्फे शनिवारी ‘मी सुगरण’ पाककला स्पर्धेचे आयोजन
नाशिक: नाशिकरोड येथील अॅक्टिव्ह लेडिज ग्रुपच्या वतीने शनिवारी (दि. ३) ‘मी सुगरण’ पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्षा सायली साखरे आणि मनसेचे पदाधिकारी प्रमोद साखरे यांनी दिली. जेलरोडच्या शिवाजीनगरजवळील ड्रीम घरकुल सोसायटीसमोरील तुलसी दर्शन रोहाउस येथे स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धकांना ३१ जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करता येईल.

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

महाशिवपुराण कथेचा आज शेवटचा दिवस
नाशिक: सातपूरच्या अशोकनगर येथे सिद्धिविनायक मित्रमंडळाच्या वतीने कथावाचक साध्वी महंत भगवतदास त्यागी (विजयादेवी) यांची महाशिवपुराण कथा सुरू आहे. बुधवारी (दि. ३१) या कथेचा शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ ते ६ या वेळेत कथा होणार आहे. कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गोदामाचे शटर तोडून खताच्या ७४ गोण्यांची चोरी, पोलिसांत गुन्हा दाखल
नाशिक: सुभाष रोडवरील गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून खताच्या ७४ गोण्या चोरी करण्याचा प्रकार आनंद महाराज गोडावून येथे उघडकीस आला. याबाबत नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि जसबीर सिंग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गोदामाचे शटर उघडून खताच्या १ लाख ८३ हजारांच्या ७४ गोण्यांची अज्ञाताने चोरी केली. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

हे ही वाचा:  शेल्टर -2024 ला  उदंड प्रतिसाद; सुट्टीचे औचित्य साधून आज साईट व्हिजिटचे अनेकांचे नियोजन !

दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडास नाशिकरोडमध्ये अटक
नाशिक: शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेल्या सराईताला गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने नाशिकरोड येथील सुभाषरोडवर कारवाई करत अटक केली. पोलिसांनी दिलेली माहिती आणि पथकाचे रवींद्र बागूल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अरबाज मोईन बागवान (२२) या सराईताला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तो शहरात वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने त्यास सापळा रचून अटक केली.

तीन लाखांच्या रोकडची चोरी करणाऱ्यास वाशिममधून अटक
नाशिक: कारमधील तीन लाखांची रोकड चोरी करुन पलायन करणाऱ्या चालकाला अटक करण्यात आली. भद्रकाली पोलिसांनी वाशिम येथे ही कारवाई केली. प्रशांत गवळी असे या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणपत हाडपे हे कामानिमित्त जिल्हा परिषद येथे आले होते. कारचालक प्रशांत गवळी यास कार पार्किंग करण्यास ते सांगून कार्यालयात गेले. गवळी याने कारमधील रोकड चोरी करत पलायन केले. पोलिसांनी संशयिताशी संपर्क साधला असता फोन बंद आला. त्याचा वाशिम येथे माग काढत अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, सत्यवान पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हे ही वाचा:  नाशिक: 1 ,2 व 3 बीएचके या पारंपरिक फ्लॅट्ससोबतच ग्राहकांचा कल 4-5 बीएचके, स्टुडिओ अपार्टमेंटकडे...

तलवार घेऊन फिरणाऱ्यास सिडकोच्या पेलिकन पार्क परिसरातून अटक
सिडको: पेलिकन पार्क परिसरात तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकास अंबड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित विलास भागडे (३२, रा. दत्तनगर, अंबड) हा पेलिकन पार्क भागात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक नदीम शेख व पथकाने पेलिकन पार्क भागात सापळा रचत संशयितास तलवारीसह ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या युवकाबाबत या अगोदरही अनेक तक्रारी होत्या.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790