नाशिक(प्रतिनिधी): ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील रहिवासी असणाऱ्या कोरोनाबाधीताचा नाशिकला उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. १९ मे २०२० रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. याबाबत प्र. अति. जिल्हा शल्यचिकित्सकांनी सविस्तर माहिती दिली आहे. वागळे इस्टेट, ठाणे येथील रहिवासी ५४ वर्षीय पुरुष व्यवसायाने चालक होते. ते कामगारांना पोहोचवण्यासाठी चारचाकी वाहनाने उत्तर प्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वी गेले होते.
उत्तर प्रदेशमधून परतत असतांना त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यामुळे सर्व पूर्तता करून परतण्यास त्यांना उशीर झाला. परतीच्या प्रवासात १८ मे २०२० रोजी चांदवड परिसरामध्ये त्यांना ताप, खोकला व श्वसनाचा त्रास जाणवला. म्हणून चांदवडमधील कोविड हेल्थ सेंटर येथे त्यांनी तपासणी केली असता त्यांना दम लागणे व रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले. म्हणून तिथेच त्यांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात आले.
दि. १९ मे २०२० रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर उपचारही सुरु झाले. त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण तीनपेक्षा जास्त होते. एक्सरे रिपोर्टमध्ये न्युमोनियाची लक्षणे आढळली होती. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना पूर्णवेळ ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र २५ मे २०२० रोजी त्यांची प्रकृती अत्यंत अस्वस्थ झाली व त्यांनी उपचारास प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे २५ मे २०२० रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला.