नाशिक (प्रतिनिधी): चोरी प्रकरणातील तपासात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीने न्यायालयातून पोलीस ठाण्यात परतल्यानंतर पोलिसांची हातावर तुरी देवून पोलीस ठाण्यातूनच धूम ठोकल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
संशयित हिरामण गांगुर्डे याने सोमवारी नांदगाव पोलीस ठाण्यातून पोबारा केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाग्या-साक्या धरण परिसरातून कृषी पंपासाठी लागणाऱ्या केबल चोरी प्रकरणात नांदगाव पोलिसांच्या गस्ती पथकाने यापूर्वी दोन जणांना अटक केली होती. याप्रकरणी नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हातील तपास सुरू असतांंना त्यांच्याकडून तपासात हिरामण धोडींबा गांगुर्डे (जानोरी, तालुका दिंडोरी) याचे नाव समोर आले होते.
त्यानुसार नांदगाव पोलिसांनी त्याला सोमवारी (दि.२६ ) न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पुन्हा पोलीस स्थानकात आणण्यात आले होते.
यावेळी पोलिसांनी जुन्या गुन्ह्यातील वाहने व्यवस्थित लावण्यासाठी पोलीस स्थानकाच्या मागील भागातील गेट उघडे होते. याचाच फायदा घेऊन या दरम्यान संशयित आरोपीने नजर चुकवत गेटमधून पोबारा केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र आरोपीला पकडण्यात अपयश आले होते.
रात्री उशिरापर्यंत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील व शहरा बाहेरील परिसर पिंजून काढल्यानंतरही पळालेला संशयित आरोपी सापडला नसल्याने नांदगाव पोलिसांपुढे आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान आहे.
या संशयित आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. याप्रकरणी नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सुरवडकर, पीएसआय मनोज वाघमारे, पोलीस हवा. श्रावण बोगीर अधिक तपास करीत आहेत.