नाशिक (प्रतिनिधी): आंतरजातीय विवाह केलेल्या गरोदर मुलीचा गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी तिचा नराधम बाप एकनाथ किसन कुंभारकर (४७) याला सर्वोच्च न्यायालयाने २० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.
आईला भेटायला नेण्याच्या बहाण्याने आरोपी कुंभारकर याने मुलीला बाळंतपणासाठी घरी नेताना गंगापूररोडवर २८ जून २०१३ रोजी रिक्षात तिचा गळा आवळून खून केला होता. याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली. लेकीचा खून करणाऱ्या पतीला फाशी द्यावी, अशी मागणी मृत मुलीच्या आईने केली होती. पत्नीने पतीविरोधात तक्रार करत लेकीसाठी न्याय मागितला होता. या प्रकरणात कुंभारकरला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने २०१७ मध्ये फाशी सुनावली. उच्च न्यायालयाने तीच शिक्षा कायम ठेवली होती केली. आता सर्वोच्च न्यायालयाने वीस वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
दरम्यान, मृत प्रमिलाच्या खून झालेल्या ठिकाणच्या मातीत समतेचा वृक्ष लावून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी जातपंचायतींच्या अनिष्ट प्रथांविरोधात लढा पुकारला होता. जातपंचायतीच्या प्रभावातून घडलेल्या या कृत्याचे पुरावे देण्यात आले होते.
जातपंचायतीविरोधात महाराष्ट्रात पहिला कायदा:
दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबत पाठपुरावा करून त्या खुनामागे जातपंचायतीच्या निर्णयाचा संदर्भ असल्याचे पुरावे शोधून ते तपास यंत्रणांना दिले होते. तेव्हापासून जातपंचायतीचे हे दाहक वास्तव प्रथमच समाजासमोर आले होते. तिच्या खुनानंतर २०१७ मध्ये महाराष्ट्र सरकारने जातपंचायतींच्या मनमानीविरोधात कायदा केला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते.