नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक : मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता सोबत सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा एक तथाकथित व्हिडिओ समोर आला होता. याप्रकरणी नाशिकचे शिवसेना ठाकरे गटाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यावर सुधाकर बडगुजर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सुधाकर बडगुजर म्हणाले की, 8 वर्षानंतर गैरकृत्य केल्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे. तिथे असणाऱ्या इतर पक्षाच्या लोकांवर देखील गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. मी फक्त तिथे 5 मिनिट होतो. त्यामुळे तिथे असणाऱ्या बाकी लोकांवर देखील कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न निंदनीय:
“खासदार हेमंत गोडसेंचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर काही कारवाई करण्यात आली नाही. विरोधकांना दाबण्याचा हा प्रयत्न निंदनीय आहे. गुन्हा दाखल झाला असेल तर न्यायालयात जाईल. दुःख हे आहे की, 8 वर्षांपूर्वीच्या घटनेत हा गुन्हा दाखल झाला आहे. 6 वर्षानंतर केस बंद करण्याचा निर्णय सरकारचा आहे. आम्ही केले ते पाप त्यांनी केले ते पुण्य असे सरकार वागत आहे. उद्धव साहेब माझ्यासोबत आहेत, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज चाललो आहे”, असे बडगुजर यांनी म्हटले आहे.
नितेश राणेंनी केला होता व्हिडिओ शेअर:
दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी मागील हिवाळी अधिवेशनात शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ताबरोबर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप राणे यांनी केला होता. याबाबतचा एक व्हिडिओ देखील त्यांनी ट्वीट केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती.
सलीम कुत्तासोबतची पार्टी भोवली:
त्यानंतर नाशिक पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने या प्रकरणी तपास सुरु केला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात काही गोष्टी समोर आल्यावर अखेर सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्टीत बडगुजर उपस्थित होते, काही भेटवस्तू दिल्या गेल्या, असे पोलिसांच्या चौकशीत झाले निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सुधाकर बडगुजरांना सलीम कुत्तासोबतची पार्टी भोवली आहे.