नाशिक (प्रतिनिधी): जागतिक पातळीवर कोरोना प्रादुर्भाव वाढत असतांना दिनांक १६/०१/२०२१ पासून देशात सर्वत्र कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत ज्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी जायचे आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना देखील कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण करणे आवश्यक आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आवाहन केल्याप्रमाणे पुणे व मुंबई महानगरपालिका यांनी घेतलेल्या निर्णयानुसार नाशिक महानगरपालिकादेखील अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सत्र आयोजित करण्याबाबत आयुक्त कैलास जाधव यांनी आदेशित केले आहेत. त्यानुसार मंगळवार दि. ०१/०६/२०२१ रोजी महात्मा फुले कला दालन, महाकवी कालिदास कलामंदिर शेजारी, शालिमार, नाशिक येथे दुपारी १२.०० वाजेपासून लसीकरण सत्रास सुरुवात करण्यात येणार आहे. सदर विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे १०० पर्यंत आहे.
अमेरिका,युरोप व इतर बहुसंख्य देशांमध्ये कोविशील्ड हि लस मान्यताप्राप्त असल्यामुळे या विद्यार्थ्यांना कोविशील्ड लस देण्यात येणार आहे, सदर कोविड -१९ प्रतिबंधनात्मक लसीकरणा करीता लागणारी लस महानगरपालिका नाशिक यांना जिल्हा लस भांडार येथून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोविड – १९ प्रतिबंधात्मक लसीकरणा करिता विध्यार्थ्यानी I-२० किंवा DS -१६० फॉर्म, ऍडमिशन निश्चित झालेचे पत्र व आयकार्ड,पासपोर्ट परवाना सोबात आणावे. व लसीकरणाचा लाभ घ्यावा.
परदेशातील नामवंत विद्यापीठात शिक्षणासाठी जाणे हि विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्वाची बाब असून केवळ लसीकरणाच्या अभावी नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात येत आहे.