नाशिक (प्रतिनिधी): शहरातील काही हॉटेलमध्ये परवाना नसतानाही लपूनछपून मद्यविक्री केली जात असल्याने अशा हॉटेल्सचालकांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई केली.
तसेच काही हॉटेलवर ग्राहकच मद्याचे पार्सल घेऊन हॉटेलचालकाच्या संमतीने मद्यपान करीत असतात. अशाही हॉटेल्सवर पोलिसांनी छापे टाकले.
अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे हॉटेल्सचालकांचे धाबे दणाणले असून, बुधवारी (ता.२६) रात्री पोलिसांनी सुमारे ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये सर्रास अवैध धंद्यांसह हॉटेल्समध्ये परवानगी नसताना मद्याची विक्री आणि मद्यसेवन केले जात असल्याचे बोलले जात होते.
अशा प्रकारातूनच रात्री गुन्हेगारांसह टवाळखोरांकडून समाज विघातक कृत्य केले जात असल्याने पोलिसांनी अशा हॉटेलविरोधात थेट धडक कारवाईचा बडगा उगारला आहे.
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखेतील विशेष पथकांनी बुधवारी (ता. २६) रात्री कारवाई केली. अमलीपदार्थविरोधी पथकाने तीन हॉटेलवर कारवाई करीत सुमारे ३४ हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला.
त्यात नाशिक रोड पोलिस ठाणे हद्दीतील हॉटेल गावरान येथे २० हजार ४५ रुपयांचा, हॉटेल संगम येथे ७ हजार ९३० रुपयांचा, तर उपनगर पोलिस ठाणे हद्दीत एका पत्र्याच्या शेडमधून सहा हजार ३०० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.
तसेच खंडणीविरोधी पथकाने आडगावच्या हद्दीतील कृष्णा हॉटेल येथून नऊ हजार ७२० रुपयांचा व मधुबन हॉटेल येथून ५ हजार ७२५ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.
तर गुंडाविरोधी पथकाने मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खाद्यपदार्थ विक्री हात गाडी चालकावर कारवाई करीत त्याच्या ताब्यातून दोन हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मुंबई नाका पोलिसात दीपक दिनेश मोरे (२५, रा. अष्टविनायक चौक, त्रिमूर्ती चौक, सिडको) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरोडा व शस्त्र विरोधी पथकानेही आडगावच्या हद्दीतील हॉटेल नलिनी येथे कारवाई करीत चार हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हे शाखेच्या विशेष पथकांनी सात गुन्हे दाखल करीत ५६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.