नाशिक (प्रतिनिधी): पर्यटनस्थळांवर मद्य प्राशन करून धुडगूस घालणाऱ्या उत्साही पर्यटकांना आवर घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गस्त ठेवली आहे. याशिवाय गड किल्ल्यांवर मद्य प्राशन केले जाऊ नये, याकडे लक्ष ठेवा असे आदेश निरीक्षकांना देण्यात आल्याची माहिती अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी दिली.
पावसामुळे निसर्ग बहरून आला आहे. काळ्याभोर जमिनीने हिरवाईची शाल पांघरली आहे. शुभ्र दुधागत धबधब्यांचे पाणी कोसळत आहे. निसर्गाची ही विविध रुपे डोळ्यांत साठविण्यासाठी पर्यटक घरांबाहेर पडत आहेत. शनिवार आणि रविवारी तर सुटीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मांदियाळी जमत आहे. वर्षाविहारासाठी घराबाहेर पडणारे हौशी आणि अतिउत्साही पर्यटक मद्य प्राशन करून धुडगूस घालत असल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.
मद्याच्या नशेत जीव धोक्यात घालून पर्यटनाचा आनंद लुटण्यात लोक मश्गूल होत असल्याचे त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यांतील पर्यटनस्थळांवर पहावयास मिळत आहे. पर्यटकांच्या अतिउत्साहाला आवर घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सरसावला आहे.. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे त्या त्या क्षेत्रातील निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांवर मद्यपींवर कारवाई करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये संबंधिताकडे मद्य प्राशन करण्याचा परवाना आहे किंवा नाही, यासह अन्य काही बाबी तपासण्यात येणार आहेत.
पुरातत्व विभागाकडून मिळेना माहिती:
जिल्ह्यात अनेक गड-किल्ले असून, त्यांचे पावित्र्य जपले जाणे गरजेचे आहे. त्यामुळे गड किल्ल्यांवरही मद्य घेऊन जाण्यास व तेथे प्राशन करण्यास बंदी आहे. जिल्ह्यातील बहुतांश गड किल्ले पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असून, त्यांची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागविली आहे. या गड किल्ल्यांच्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सूचना फलक लावण्यात येणार आहेत. परंतु, अद्याप पुरातत्व विभागाकडून यादी मिळालेली नाही.
पर्यटन स्थळांवर मद्यपान केले जाणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना आमच्या निरीक्षक, दुय्यम निरीक्षकांना केल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी आमची पथके गस्त घालणार आहेत. पर्यटनस्थळी मद्य बाळगताना किंवा प्राशन करताना कुणी आढळले, तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.- शशिकांत गर्जे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क