नाशिक: भरधाव कारची 3 वाहनांना धडक; चिमुकलीसह तिघे जखमी

नाशिक (प्रतिनिधी): कॉलेज रोडवर भरधाव वेगातील कारने तीन कारला धडक दिल्याची घटना शनिवारी (ता. १९) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या विचित्र अपघातामध्ये एका कारमधील दोन वर्षांची चिमुकली, तिचे वडील व वॉचमन असे तिघे जखमी झाले असून, तीन वाहनांचे नुकसान झाले आहे.

🔎 हे वाचलं का?:  दहावी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध

याप्रकरणी गंगापूर पोलिसांत कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

कॉलेज रोडवर प्रि. टी. ए. कुलकर्णी सिग्नल आहे. याच सिग्नलवरून येवलेकर मळ्याकडे भरधाव कार (एमएच ०२, एवाय १८२४) जात होती. कारचालक अभिषेक अजय शिंपी (वय २६, रा. नाशिक) याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने तीन कारला धडक देत अपघात केला.

🔎 हे वाचलं का?:  लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा महत्वाचा निर्णय, आदिती तटकरे यांची पोस्ट नेमकी काय?

या अपघातामध्ये एका कारमधील स्वामी हरिशंकर बॅनर्जी (रा. सीरिन मिडोज), त्यांची दोन वर्षांची मुलगी लिओना बॅनर्जी व त्यांचा वॉचमन त्र्यंबक पगार हे तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस घटनास्थळी पोचले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित कारचालकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. या अपघातात एमएच १५ डीसी १०२०, एमएच १५ एचव्ही ४३२५ आणि एमएच १५ जीएफ ५८४६ या तीन कारचे नुकसान झाले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'सूर्यकिरण एअर शो'मुळे २२ व २३ जानेवारीला 'या' वाहतूक मार्गात बदल

सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790