म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी जिल्ह्यात टास्क फोर्सचे करणार गठन

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनानंतर आता पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस आजार प्रचंड वेगाने वाढत आहे. यामध्ये कान, नाक, घसा तज्ञांचे सहकार्य महत्वाचे असणार आहे, त्यासाठी जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी टास्क फोर्सचे गठन करण्याच्या व त्यासाठी मॉडेल ऑपरेशन थिएटरची तातडीने निर्मिती करण्याचा निर्णय आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस  जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे, कोरोना नोडल अधिकारी डॉ.आवेश पलोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत खैरे, कान नाक घसा तज्ज्ञ डॉ.शब्बीर इंदोरवाला, डॉ.पुष्कर लेले, डॉ.प्रदीप गोंधळे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा  प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मोठ्या प्रमाणावर रूग्ण कोरोनामुक्त होत आहेत परंतु काही रूग्णांना कोरोना उपचारानंतरच्या अनेक व्यांधींचाही सामना करावा लागतोय त्यात प्रमुख्याने म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने अनेक रूग्णांच्या आरोग्यावर परिणाम होतोय, त्यासाठी पोस्ट कोविड सेंटरवर कान, नाक, घसा तज्ज्ञांची नेमणूक करण्यात यावी. कोविड झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांची नियमितपणे तपासणी करण्यात यावी.

⚡ हे ही वाचा:  सिन्नरला बस थेट फलटावर घुसली; ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, तिघे गंभीर... व्हिडीओ बघा…

या आजाराचे गंभीर स्वरूप विचारात घेता याकरता योग्य ती पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने तसेच टास्क फोर्स गठीत करून यामध्ये जिल्हा रुग्णालय, मनपा रुग्णालय आणि खाजगी डॉक्टरांचाही समावेश करण्यात यावा असे बैठकीत ठरले.

शासनामार्फत महात्मा फुले जनआरोग्य योजनेत म्युकरमायकोसिस आजाराचा समावेश करण्यात आला असून जिल्हा रुग्णालय, मनपा रुग्णालय आणि खाजगी डॉक्टरांच्या एकत्रित मदतीने कामकाज करण्यात यावे. जनआरोग्य योजनेत कान, नाक व घसा यावर उपचार करणाऱ्या ज्या रूग्णालयांचा समावेश नाही त्यांचा तातडीने समावेश करण्यात यावा. तसेच  खाजगी डॉक्टरांनी यामध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहनही या बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: कुंभमेळा प्राधिकरणाची नाशिक विमानतळ विस्तारीकरणास प्रशासकीय मान्यता

म्युकरमायकोसिससाठी सर्व बाबतीत पूर्वतयारी करावी: सूरज मांढरे
म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना या आजाराची बाधा होते आहे. सद्यस्थितीतील करोना उपचारांमध्ये काही सुधारणा आवश्यक आहेत काय जेणेकरून या आजाराचा उपसर्ग टाळता येईल तसेच जिल्ह्यातील आजची वैद्यकीय व्यवस्था विचारात घेता त्यामध्ये अधिक काय सुधारणा करणे आवश्यक आहे याबाबत टास्क फोर्सने सूचना कराव्यात असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. तसेच कोरोना आजारातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांनी पोस्ट कोविड सेंटर मधून तपासण्या करुन घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी  मांढरे यांनी यावेळी केले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: उद्योजकांना धमकी देऊन खंडणी मागणाऱ्याला अटक !

म्युकरमायकोसिससाठी अशी असेल टास्क फोर्स समिती:
म्युकरमायकोसिसटास्क फोर्सची समिती गठीत करण्याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आदेश जाहिर केले आहे. या टास्क फोर्स समितीमध्ये या विषयातील तज्ज्ञ डॉ.शब्बीर इंदोरवाला, डॉ.पुष्कर लेले, डॉ.प्रदीप गोंधळे, डॉ.शितल गुप्ता, डॉ. भरत त्रिवेदी, डॉ. संजय बापये, महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे, महानगरपालिकेचे नोडल ऑफीसर कोरोना व्यवस्थापन डॉ.आवेश पलोड इत्यादी सदस्य असून या समितीचे समन्वय म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात काम पाहणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त विषयाच्या आवश्यकतेप्रमाणे अधिक तज्ज्ञांना विशेष निमंत्रित म्हणून समावेश करण्याची मुभा समन्वयकांना असणार असल्याचेही  मांढरे यांनी आदेशात नमूद केले आहे.

बैठकीत उपस्थित सर्व खाजगी डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकीतून म्युकरमायोसिस रुग्णांवर उपचार व मार्गदर्शन करण्याची ग्वाही दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

here