इमारतीच्या तिसर्या मजल्याच्या गच्चीवरील प्लायवूडवर पाणी का मारले, याचा जाब विचारल्याने चुलत भावाने बहिणीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत बहिणीचा मृत्यू झाला. ही घटना गंगावाडी, रविवार पेठ येथे घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चुलत भावाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चुलत भावास अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आश्विनी सतिष चव्हाण असे मृताचे नाव आहे. चुलत भाऊ दिगंबर ऊर्फ भैय्या संजय चव्हाण असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, इमारतीच्या तिसर्या मजल्याच्या गच्चीवरील प्लायवूडवर पाणी का मारले, याचा जाब विचारल्याने दिगंबर चव्हाण याने चुलत बहीण आश्विनी चव्हाण यांना मारहाण केली. याप्रकरणी आश्विनी चव्हाण यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिगंबर चव्हाणविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर त्या घरी गेल्या असता चक्कर आल्याने त्या बेशुद्ध झाल्या. कुटुंबियांनी उपचार्थ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथुन त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी आश्विनी चव्हाण यांच्या आई कल्याणी चव्हाण यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पुतण्या दिगंबर चव्हाण याने शुक्रवारी (दि.३) सायंकाळी ६ वाजता आश्विनीच्या डोक्याचे केस धरुन तिला फरशीवर आपटले. त्यात चक्कर आल्याने तिची प्रकृती खालावली आहे, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार पोलिसांनी दिगंबर चव्हाणवर गुन्हा दाखल केला होता. रविवारी (दि.५) दुपारी दीड वाजेदरम्यान आश्विनी चव्हाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी दिगंबर चव्हाण यास अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.