नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): साईबाबा मंदिर दर्शन, आरती पासची उच्च दरात विक्री होत असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणातील अहवालाची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने दर्शन व आरती पासेस काढण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक केले आहे.
न्यायालयाने मंदिर प्रशासनाला आदेश दिले आहेत की, दर्शन/आरती पास देण्यासाठी प्रत्येक भक्ताची माहिती घ्यावी. तसेच दर्शन/आरती पासवर आधार क्रमांक नमूद करावा. यामुळे पासची विक्री रोखण्यास मदत होईल.
याशिवाय कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी जनहित याचिका दाखल करून मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या याचिकेत त्यांनी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्था केंद्रीय पोलीस राखीव दल किंवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांच्या मार्फत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यावर उच्च न्यायालय तिरुपती देवस्थानच्या सुरक्षेचा अभ्यास करून निर्णय घेणार आहे. यासाठी तिरुपती देवस्थानकडून गोपनिय अहवाल मागविण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर तथा अध्यक्ष यांनी सादर केलेल्या गोपनीय अहवालामधील गंभीर निरीक्षणे लक्षात घेता मंदिराच्या सुरक्षा संदर्भात काही एक बदल न करता सर्व सुरक्षा व्यवस्था प्रधान जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षांच्या आदेशानुसारच चालेल अथवा बदलेल, असे निर्देश दिले. उच्च न्यायालयाचे न्या. रवींद्र व्ही. घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास तो उच्च न्यायालयच्या आदेशाचा अवमान समजला जाईल, असे देखील आदेशात म्हटले आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने प्रज्ञा तळेकर व अजिंक्य काळे काम पाहत आहेत. तर शासनाच्या वतीने अॅड. अमरजित गिरासे, संस्थानच्या वतीने अॅड. संजय मुंढे काम पाहत आहेत.