नाशिक (प्रतिनिधी): शिवसेना ठाकरे गट नेत्या अदिना सय्यद आणि स्थानिक रहिवाशांच्या लढ्यास यश आले आहे. सारडा सर्कल परिसरात नव्याने सुरू झालेले वादग्रस्त दारूचे दुकान कम बिअरबार शॉपी अखेर सहा महिन्यांसाठी बंद करण्याचे आदेश पारित झाले आहे.
जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्याकडून आदेश काढण्यात आले. निर्णयाबाबत रहिवासी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
सारडा सर्कल भागात दारूचे दुकान उघडण्यात आले होते. स्थानिकांसह विद्यार्थ्यांच्या पालकांकडून दुकान तत्काळ बंद करावे, यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अदिना सय्यद आणि माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवाशांनी लढा उभारला होता.
दुकान बंद करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. काही दिवसांपूर्वी दुकानाबाहेर आंदोलन झाले होते. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागास कारवाईच्या सूचना केल्या होत्या.
चौकशी होऊन दुकानामुळे विविध समस्या निर्माण झाल्याचे निष्कर्ष राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांकडून नोंदविले. याबाबत अहवाल तयार करण्यात आला. त्यावर कारवाई करून जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूचे दुकान सहा महिन्यांसाठी बंद करण्याचे आदेश काढले.
त्यामुळे अखेर दुकान बंद केले आहे. आदेशाची प्रत तक्रारदार तसेच दुकान मालकांना देण्यात आली आहे. अवैधरीत्या दारूविक्री करताना आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.
याशिवाय दुकानाचा परवाना रद्द करण्याबाबत स्थानिक वॉर्ड तसेच रहिवाशांच्या मागणीनुसार आवश्यक ती पुढील कारवाई करण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे.
“दारूचे दुकान बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्याकडून देण्यात आले. त्यांचे मनःपूर्वक आभार. सहा महिन्यांसाठी जरी आदेश असले तरी दुकान कायमस्वरूपी बंद होऊन याचा परवाना कसा रद्द होईल. पुढील पाठपुरावा सुरू ठेवण्यात येईल.” – अदिना सय्यद