नाशिक (प्रतिनिधी): अंबड एमआयडीसीतील स्क्रॅप मटेरिअल घेणाऱ्या कंत्राटदाराला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी शहर गुन्हेशाखेच्या खंडणीविरोधी पथकाने दोघांना अटक केली. या प्रकरणी अंबड पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युसूफ खान ऊर्फ सोनू, माया गांगुर्डे असे अटक करण्यात आलेल्या दोघा खंडणीखोरांची नावे आहेत. तर यांचा तिसरा साथीदार पसार असून, त्याचा पोलिस शोध घेत आहेत. मेहेबुल्ला नूरमोहम्मद खान (रा. केवल पार्क, अंबड-लिंक रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी अंबड एमआयडीसीतील काही कंपन्यांमधील स्क्रॅप मटेरिअल घेण्याचे कंत्राट घेतलेले आहे.
संशयितांनी कंत्राटदाराला ‘धंदा करायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील. अन्यथा जीवे मारू, अशी धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती. तसेच, खान यांच्या कर्मचाऱ्यांना एमआयडीसीत वेळोवेळी अडवून धमकावत होते.
तडजोडीअंती दोन लाख रुपये खंडणी देण्याचे ठरले. त्यापूर्वीच पोलिसांनी संशयितांना अटक केली. दरम्यान, या संशयितांनी इतर कंत्राटदारांसह व्यावसायिकांकडेही खंडणीची मागणी केल्याचे समोर येते आहे.
याप्रकरणी खंडणी विरोधी पथक सखोल तपास करीत आहे. दरम्यान, माया गांगुर्डे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. तर, युसूफ हा दहा वर्षांपासून स्क्रॅपचा व्यवसाय करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
युसूफ, माया आणि त्याचा साथीदार हे तिघे स्थानिक असल्याची बतावणी करून कंत्राटदारासह कामगारांकडे खंडणीची मागणी करून जीवे ठार मारण्याची धमकी देत पैसे उकळायचे. या प्रकरणी खान यांनी अंबड पोलिसांत फिर्याद देताच खंडणी विरोधी पथकाने दोघा संशयितांना अटक केली आहे.