नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात अपघातांची मालिका सुरूच आहे. सातपूर-अंबड लिंक रोडवर आज सकाळी झालेल्या अपघातात एक विद्यार्थी जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर झाले आहेत.
ज्योती फार्म समोर तीन शाळकरी मुले मोटरसायकलने क्लासला जात होते. त्याचवेळी हा अपघात झाला. या अपघातात सार्थक दामू राहाणे हा जागीच ठार झाला तर त्याचे दोन मित्र योगेश आणि भावेश हे गंभीर जखमी झाले.
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडे सहा वाजता हा अपघात झाला. अंबड लिंक रोडवरील जाधव संकुल मधील राहणारे योगेश व भावेश या दोन्ही भावांचा मित्र सार्थक दामू राहाणे हे तिन्ही मोटरसायकलवरून सातपूर कॉलनीत क्लासला जात होते.
एम्पायर हॉटेल समोर अज्ञात वाहानाने मोटारसायकलला कट मारला. त्यामुळे मोटरसायकल दुभाजकावर धडकली. यात सार्थक राहाणे हा जागीच ठार झाला तर योगेश व भावेश हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले.
औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये पहिली शिफ्टसाठी जाणाऱ्या कामगारांनी हा अपघात पाहिला. त्यांनी त्वरीत धाव घेत मदतकार्य केले. तसेच पोलिसांना कळवले. सातपूर पोलिसांनी जखमींना उपचारासाठी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.