नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गोविंदनगर येथील सत्संग भवन येथे मानव एकता दिनानिमित्त आयोजित शिबिरात ३०९ भाविकांनी रक्तदान केले. संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा असलेल्या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे संपूर्ण देशभर २०७ ठिकाणी आयोजित शिबिरात ५० हजार युनिट रक्त संकलित करण्यात आले.
गोविंदनगर येथील संत निरंकारी सत्संग भवनमध्ये आयोजित शिबिरात जिल्हा रुग्णालय व संदर्भ सेवा रुग्णालयाच्या पथकाने ३०१ रक्तपिशव्या संकलित केल्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक चारुदत्त शिंदे, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, संदर्भ सेवा रुग्णालयाचे डॉ. पुरुषोत्तम पुरी आदी मान्यवरांनी शिबिरास भेट दिली. संत निरंकारी मंडळ नाशिकचे सेक्टर संयोजक गुलाब पंजवाणी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
दरम्यान, रक्तदान शिबिरात जनसमुदायाला ऑनलाइन संबोधित करताना सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, की सेवा नेहमी निष्काम भावनेनेच केली जाते. ही भावना जेव्हा आपल्या हृदयात वास करते तेव्हाच खऱ्या अर्थाने आपले जीवन मानवतेच्या कल्याणार्थ समर्पित होते. या वेळी संपूर्ण जिल्हाभरातून भाविक उपस्थित होते.