नागपूर | दि. ११ सप्टेंबर २०२५: समृद्धी महामार्गावर वाहनं पंक्चर करून लुटमारीसाठी खिळे टाकण्यात आल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, पोलिस आणि संबंधित यंत्रणांनी यामध्ये कोणतीही लूटमारीची बाब नसून, तो प्रत्यक्षात महामार्ग दुरुस्तीच्या कामाशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माळीवाडा इंटरचेंज परिसरात मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीकडून रस्त्यावरील भेगा बुजविण्याचे काम सुरू होते. या कामासाठी ‘इपॉक्सी ग्राउटिंग’ तंत्राने भेगांमध्ये मिश्रण सोडण्यासाठी लोखंडी नोझल्स बसवण्यात आल्या होत्या.
नेमके प्रकरण काय?:
काम सुरू असलेल्या भागातून काही वाहने गेल्याने चार कार पंक्चर झाल्या. यावेळी जालन्यातून पनवेलकडे जाणारे प्रवासी संतोष सानप यांनी व्हिडीओ काढला. यात पुलावर खिळे ठोकले असल्याचा गैरसमज झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली.
अधिकृत स्पष्टीकरण:
महामार्ग प्राधिकरणाकडून कळविण्यात आले की, हा चोरी किंवा लुटमारीचा प्रकार नसून, नियमित देखभाल आणि दुरुस्तीचा भाग आहे. बुधवारी काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावरील सर्व नोझल्स काढून टाकण्यात आले.
तज्ज्ञांचे निरीक्षण:
काम सुरू असल्याची पूर्वसूचना देण्यासाठी किमान २०० मीटर आधी ब्लिंकर्स आणि सूचना फलक लावणे आवश्यक होते. ते न लावल्यामुळेच गोंधळ झाला, असे तज्ज्ञांचे मत आहे. या त्रुटीबद्दल संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रशासनाचा इशारा आहे.
![]()

