नाशिक (प्रतिनिधी): नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर खड्ड्यांची आरास निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच पालकमंत्री दादा भुसे यांनी अचानक रस्त्यांची पाहणी केल्यानंतर महापालिका ‘अॅक्शन मोड’मध्ये आली आहे.
सहा विभागात खड्डे बुजविण्यासाठी १०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
गेल्या पाच वर्षात शहरात रस्ते दुरुस्ती व नवीन रस्ते तयार करण्यासाठी बाराशे कोटींहून अधिक निधी खर्च झाला आहे. या वर्षीदेखील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यासंदर्भात नागरिकांमध्ये ओरड सुरू झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनीदेखील महापालिकेकडे तक्रारी केल्या.
त्याशिवाय पालकमंत्री दादा भुसे यांनी अचानक दौरा करून रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी केली. महापालिकेला पंधरा दिवसात खड्डे बुजविण्याचा अल्टिमेटम दिला.
त्यानुसार आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी गुरुवारी (ता. १०) झालेल्या महासभेवर १०४ कोटी ३३ लाख रुपयांच्या खड्डे दुरुस्तीच्या कामांना मंजुरी दिली.
त्यानंतर बांधकाम विभागाने तत्काळ स्थायी समितीसमोर विभागनिहाय रस्ते दुरुस्तीसाठीचे १०४ कोटींचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवले.
त्या प्रस्तावांनाही मंजुरी मिळाली. एमएनजीएल कंपनीने रस्ते खोदाईच्या बदल्यात महापालिकेकडे रस्ते तोडफोड फी जमा केली आहे. एकूण १६० कोटी रुपये महापालिकेकडे जमा करण्यात आले आहे. त्यातील १०४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.
विभागनिहाय रस्ते दुरुस्तीचा खर्च. विभाग- एकूण खर्च (रुपयांत)
- पश्चिम: २० कोटी ६४ लाख
- सिडको: २० कोटी १० लाख
- नाशिकरोड: १८ कोटी ९३ लाख
- पूर्व: १४ कोटी ९० लाख
- पंचवटी: १४ कोटी ५० लाख
- सातपूर: १५ कोटी २३ लाख