नाशिक (प्रतिनिधी): फेसबुक लाईव्हद्वारे पोलिस दलाविषयी अप्रितीची भावना निर्माण केल्याप्रकरणी तसेच जाणीवपूर्वक चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले रोहन जयवंत देशपांडे यांना गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने पुणेनजिकच्या देहु आळंदी येथून ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी प्रेस नोट जारी केली आहे.
या प्रेस नोटमध्ये नमूद केल्याप्रमाणे, कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदी तसेच संचारबंदीचे आदेश असताना २५ मे रोजी व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये आम आदमी पार्टीचे जितेंद्र भावे, अमोल जाधव तसेच इतर २० ते २५ जणांनी डिपॉझिट परत मिळावे यासाठी आंदोलन केले होते.. त्यामुळे संबंधितांविरुद्ध मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. याबाबत स्थानिक वर्तमानपत्रात वृत्त तसेच मनपा आणि पोलिस आयुक्तांच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्या होत्या.
पोलिस आयुक्तांनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत रोहन जयवंत देशपांडे (वय ३२, रा. फ्लॅट क्रं. ७/८, वास्तु समृद्धी हौसिंग सोसायटी, शाहुनगर, मोटवानी रोड, नाशिकरोड) याने फेसबुक लाईव्ह करत पोलिस दलाविषयी जनसामान्यांमध्ये अप्रितीची निर्माण होऊन अविश्वास निर्माण करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक चिथावणी दिली. तसेच शांतता भंग करण्याच्या हेतूने लोकांना प्रक्षोभित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्याचा वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या तक्रारीन्वये भादंवि कायदा कलम ११७, ५०४, पोलिसांप्रती जानमानसांमध्ये अप्रितीची भावना चेतवणे अधिनियम १९२२ चे कलम ३, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संशयित रोहन देशपांडे हे पुण्यानजिकच्या देहु आळंदी येथे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी यांना मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलिस अंमलदार मनोज डोंगरे, मोतीराम चव्हाण, राहुल पालखेडे, प्रवीण चव्हाण, राम बर्डे यांनी देहु आळंदी येथे जाऊन रोहन देशपांडे यांना ताब्यात घेतले. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद परोपकारी तपास करत आहेत.