नाशिक (प्रतिनिधी): साडी नेसून, तृतीयपंथीय व स्री वेश धारण करून रात्रीच्या वेळी महामार्गावर गाड्या थांबवून त्या लुटण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला संगमनेर शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
या टोळीकडून २ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांच्या या कामगिरीने संगमनेर शहर व तालुक्यात घडलेल्या चोऱ्या, घरफोड्या आणि दरोड्यांचा तपास लागण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सहा चोरट्यांना अटक केली आहे.
संजय मारुती शिंदे (वय 25 वर्षे रा.चिसखेड ता. भोताळा जि. बुलठाणा), ओकांर शंकर शेगर (वय 23 वर्षे रा. टाकळी तलाव पोस्ट ढोरपगाव ता. खामगाव जि बुलढाणा), सुनिल बाबुराव सांवत (वय 32 वर्षे रा. टाकळी तलाव ता. खामगाव जि. बुलढाणा), राजेश शंकर शेगर (वय 25 वर्षे रा. टाकळी तलाव ता. खामगाव जि. बुलढाणा), साजन शिवलाल चव्हाण (वय 25 वर्षे रा. टाकळी तलाव पोस्ट ढोरपगाव ता. खामगाव जि. बुलढाणा), किशोर महादेव इंगळे (वय 21 वर्षे रा. टाकळी तलाव पोस्ट ढोरपगाव ता. खामगाव जि. बुलढाणा) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
मागील काही दिवसापासुन संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. रात्रीच्या वेळी घरफोडी, वाहन चोरी करणारी टोळी सतर्क झालेली होती. याला आळा घालण्यासाठी संगमनेर शहर पोलिसांच्या वतीने विविध प्रकारचे समांतर प्रयत्न चालू होता.
पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर नसलेल्या चोरट्यांना पकडण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी सापळा रचून चोरट्यांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. तसेच नाकाबंदी करून संशयीत वाहने चेक करणे सुरु होते.
गुरुवारी संगमनेर शहरातील मच्छी चौक, पावबाकी रोड येथे नाकाबंदी दरम्यान एक संशयीत चार चाकी वाहन हे नाकाबंदीचे कर्मचारी यांना हुलकावणी देऊन पळून जाऊ लागले असता सदर वाहनाचा पाठलाग करुन त्या चारचाकी वाहनास पकडले.
गाडीमध्ये सहा इसमांकडे लाकडी दांडे, लोखंडी टॉमी, गज, लोंखडी कडे, साडी, मिरची पुड व रोख रक्कम असे एकुण 2 लाख 83 हजार 150 रुपयांचे दरोडा टाकण्याचे साहित्य मिळून आले असून त्यांनी हायवेला साड्या नेसून, स्री वेश धारण करून वाहने थांबवून गाड्या लुटण्याच्या तयारीत असल्या बाबत कबुली चोरट्यांनी दिली आहे.
संगमनेर शहर पोलीस स्टेशनला भा.द.वि. कलम 399,402 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर सहा आरोपींकडे तपास सुरु आहे. शहर पोलीस स्टेशन हद्दीत व परिसरात जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कारवाई संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, उपनिरीक्षक विठ्ठल पवार, हवालदार विजय खाडे, पोलीस नाईक विजय पवार, पोलीस शिपाई विशाल कर्पे, रोहीदास शिरसाठ, अविनाश बर्डे, हरिश्चंद्र बांडे, आत्माराम पवार, अजित कुऱ्हे, अतुल उंडे यांनी केली असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार हे करीत आहेत.