नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरीसह घोटीमध्ये गेल्या २४ तासामध्ये प्रत्येकी १०१.८ मिलीमीटर इतकी अतिवृष्टी झाली आहे.
बागलाण, कळवण, सुरगाणा, नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, पेठ आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे.
इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे शनिवारपासून (ता. १) ५ जुलैपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तसेच पेरणीयोग्य पाऊस झाला आहे, अशा ठिकाणी वापसा आल्यानंतर जमिनीतील ओलावा पाहण्यासोबत पुढील पावसाचा अंदाज घेत खरीपाच्या पेरण्या सुरु करण्याचा सल्ला केंद्राच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे. तसेच पेरणीपूर्वी बियाण्याची प्रक्रिया करावी, असेही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.
मॉन्सूनची हजेरी जिल्ह्यात सर्वदूर राहिली आहे. गेल्या २४ तासांमध्ये तालुकानिहाय झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये आणि आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी पुढीलप्रमाणे असून (कंसात गेल्यावर्षीच्या जूनमधील पावसाची टक्केवारी दर्शवते) : मालेगाव-३.३-७०.९ (१९९.८), बागलाण-१६.४-५८.७ (१२८.४), कळवण-१८.३-७३.२ (११३), नांदगाव-०.४-४६.१ (१४६.४), सुरगाणा-५८.९-६६ (६५.८), नाशिक-१२.७-३६.४ (६५.२), दिंडोरी-१५.८-५५.१ (१०६), इगतपुरी-६५.५-४९.९ (२६.७), पेठ-५०.१-५२.१ (७२.१), निफाड-४.७-६९.९ (१०२.२), सिन्नर-७.८-४७ (११३.५), येवला-०.८-७५.६ (६३.९), चांदवड-२.७-३८.४ (१९३), त्र्यंबकेश्वर-५४.४-६९ (४४.१), देवळा-१.६-६०.३ (१४८.६).
जिल्ह्यात जूनमधील ३० दिवसांपैकी ८ दिवस पावसाचे राहिले असून आज सकाळपर्यंत ५३.८ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. जिल्ह्यातील मोठ्या ७ आणि मध्यम १७ अशा एकुण २४ धरणातील जलसाठा २१ टक्के आहे.