नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अवघे नाशिक शहर सज्ज झाले असून, मोदी यांच्या दिवसभराच्या दौऱ्यात श्री काळाराम मंदिरात दर्शन व आरती, तसेच कुंभमेळा होणाऱ्या त्या गोदाघाटाची पाहणी व शक्य झाल्यास तेथेही आरतीचा कार्यक्रम होणार आहे.
त्यानंतर हॉटेल मिरची ते संत जनार्दन स्वामी महाराज चौक या दरम्यान १.१ किलोमीटर रोड-शो होईल त्यानंतर तपोवनातील मोदी मैदानावर भव्य जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासह कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाल्याचा दावा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केला.
२०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची तपोवनाच्या मोदी मैदानावर भरपावसात जाहीर सभा झाली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनादेशपान ८ वर यात्रेचा समारोप याच मैदानावर झाला. त्या वेळी मोदी यांची जाहीर सभा झाली होती. पंतप्रधान मोदी यांची त्याच मैदानावर तिसरी सभा होत आहे. आतापर्यंत या मैदानावर भाजप वगळता एकाही राजकीय पक्षाची सभा झालेली नाही.
राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सकाळी अकराला जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी गेल्या तीन दिवसांपासून ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन तळ ठोकून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी अकराला राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन व त्यानंतर सभा होईल. सभेसाठी जर्मन तंत्रज्ञानावर आधारित कापडी मंडप उभारण्यात आला आहे.
२०० फूट रुंद व ८०० फूट लांब मंडपामध्ये ५० हजार प्रेक्षक बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंडपामध्ये ४० बाय १०० फूट आकाराचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय युवक व क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
जाहीर सभेपूर्वी हॉटेल मिरची ते संत जनार्दन स्वामी आश्रमापर्यंत दीड किलोमीटरचा रोड-शो होईल. त्यानंतर श्री काळाराम मंदिरात दर्शन घेतील. येथे मोदी यांच्या हस्ते आरती होईल. त्यानंतर गोदाघाट पाहणी करतील. मोदी यांच्या हस्ते गोदाआरती करण्याचे नियोजन आहे. मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेसह राज्य गुप्तचर विभागाच्या पथकांनी मैदानाचा ताबा घेतला आहे.