नाशिक (प्रतिनिधी): प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रातील १८ पोलिसांना शौर्य पोलीस पदक जाहीर झाले आहे. तर, चार पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपदी पदक जाहीर झाले असून, ४० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना गुणवंत पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.
यात नाशिक पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक उत्तम सोनवणे, बीडीडीएसचे सहायक उपनिरीक्षक नंदू उगले, सहायक उपनिरीक्षक अशोक काकड आणि वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार नितीन संधान यांचा समावेश आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने विशेष कामगिरी करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहे.
यात महाराष्ट्र पोलीस दलातील १८ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य पोलीस पदक, चौघांना राष्ट्रपदती पोलीस पदक तर, ४० अधिकारी-कर्मचाऱ्यांना गुणवंतापूर्ण सेवेचे पोलीस पदक जाहीर झाले आहेत.
यांना मिळाले पोलीस पदक:
पोलीस उपनिरीक्षक सोनवणे: १९८८ मध्ये नाशिक शहर पोलीस दलात भरती झालेले उत्तम सोनवणे यांनी ३५ वर्षांच्या पोलीस सेवेत २०० रिवॉर्डस् व ७ प्रशस्तीपत्र मिळविले आहेत. मूळचे मनेगाव (ता. सिन्नर) येथील असलेले सोनवणे यांनी अंबड, भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, इंदिरानगर, गुन्हेशाखा, सीआयडी याठिकाणी कर्तव्य बजावले आहेत. २०२१ मध्ये त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. सध्या अंबड पोलीस ठाण्यात सेवेत असून, गेल्या वर्षी कारागृहात संचित रजेवर आलेल्या आरोपीने पवननगर येथे ब्युटिपार्लरमध्ये शिरून महिलेवर बलात्कार केला होता. त्यास उपनिरीक्षक सोनवणे यांनी शिताफीने अटक केली होती.
सहायक उपनिरीक्षक उगले: १९९० मध्ये शहर पोलीस दलात भरती झालेले नंदू उगले यांनी आपल्या ३३ वर्षांच्या सेवाकाळात १८९ रिवॉर्डस्, ६ प्रशस्तीपत्रे मिळविली आहेत. तसेच, २०१९ मध्ये पोलीस महासंचालक पदकानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. उगले यांनी नाशिकरोड, पंचवटी, भद्रकाली, अंबड, शहर वाहतूक शाखा, आर्थिक गुन्हेशाखा येथे कर्तव्य बजावले असून, सध्या बॉम्ब शोधक पथकात कार्यरत आहेत. पोलीस दलास असतानाच आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणूनही उगले यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे. राष्ट्रीयस्तरासह ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, अमेरिका येथे पार पडलेल्या विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये उगले यांनी पदकांची कमाई केली आहे.
सहायक उपनिरीक्षक काकड: १९८९ मध्ये शहर पोलीस दलात दाखल झालेले अशोक काकड यांनी ३६ वर्षांच्या सेवाकाळात २८१ रिवॉर्डस, ९ प्रशस्तीपत्रे मिळविली आहेत. तसेच, नाशिकरोड, भद्रकाली, इंदिरानगर, शहर वाहतूक शाखा, पोलीस मुख्यालयात सेवा केली असून सध्या पंचवटी पोलीस ठाण्यात सहायक उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. गुन्हेशोध पथकांमध्ये काम करीत असताना अनेक गुन्ह्यांची काकड यांनी शिताफीने उकल केली आहे.
हवालदार संधान: १९९१ मध्ये शहर पोलीस दलात दाखल झालेले नितीन संधान हे मूळचे विंचूर (ता. निफाड) येथील आहेत. गुन्हेशाखेसह अंबड, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जात पडताळणी विभागात कर्तव्य बजाविलेले संधान सध्या शहर वाहतूक विभाग दोनमध्ये सेवा बजावत आहेत. ३३ वर्षांच्या सेवाकाळात संधान यांनी २२० रिवॉर्डस्, ५ प्रशस्तीपत्र तर, २०२२ मध्ये पोलीस महासंचालकांचे पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. अंबड पोलिस ठाण्यात असताना संधान यांनी टिप्पर टोळीचा सराईत गुन्हेगार गण्या कावळ्या यास शिताफीने अटक केली होती.