नाशिक (प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगर रोडवरील (औरंगाबाद रोड) सेवन हॉर्स हॉटेलवर आडगाव पोलिसांनी छापा टाकून अवैधरीत्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरचा अड्डा उद्ध्वस्त केला.
पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांसह साहित्य जप्त करीत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे शहरात अजूनही अवैधरीत्या हुक्का पार्लर सुरू असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर रोडवर वैष्णवी गार्डन लॉन्स आहे. जवळच सेवन हॉर्स हॉटेल असून, या ठिकाणी अवैधरीत्या हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार आडगाव पोलिसाच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून सोमवारी (ता. २४) रात्री साडेअकराच्या सुमारास सेवन हॉस हॉटेलवर छापा टाकला असता, त्या वेळी हॉटेलमध्ये अवैधरीत्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा वापर करून हुक्का पार्लर चालविला जात असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांच्या पथकाने सिव्ल्हर फॉइल लावलेले तीन हुक्का पॉट व प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचे फ्लेव्हर, असा पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच, संशयित भूषण जगन्नाथ देवरे (वय ३१, रा. अमित सोसायटी, पाथर्डी फाटा), रिबुल अहमद बोनोबोईयान (१९, रा. सेवन हॅार्स हॉटेल, मूळ रा. नोगाव, डाकीन, डेब्रोस्तान, आसाम), कृष्णा हिरामण पेखळे (२७, रा. माडसांगवी, ता. नाशिक) यांच्याविरोधात आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार ढापसे तपास करीत आहेत.