नवी दिल्ली (वृत्तसंस्था): नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या मंत्रिमंडळाचा खातेवाटप जाहीर करण्यात आला असून अमित शाह यांच्याकडे गृहखातं कायम ठेवण्यात आलं आहे. तर शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषीमंत्रालयासोबत ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. सर्व महत्त्वाची खाती भाजपने वरिष्ठ मंत्र्यांकडे दिली असून कोणतीही रिस्क घेतली गेली नाही.
मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एस जयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वेमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (9 जून) नवीन NDA आघाडी सरकारच्या 71 मंत्र्यांसह शपथ घेतली होती. मोदींच्या या तिसऱ्या मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, पाच जणांकडे स्वतंत्र प्रभार आणि 36 राज्यमंत्री आहेत. मोदी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर भाजपने गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय स्वतःकडे ठेवल्याचं स्पष्ट झालं आहे.
गेल्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांच्याकडे असलेल्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी आता बिहारच्या जितन राम मांझी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय?
अमित शाह- गृहमंत्रालय, राजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालय, एस जयशंकर – परराष्ट्र, नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक, निर्मला सीतारमन – अर्थमंत्रालय, शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय, जीतन राम मांझी – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, पियुष गोयल -वाणिज्य, अन्नपूर्णा देवी- महिला आणि बाल विकास मंत्रालय, भूपेंदर यादव – पर्यावरण, राम मोहन नायडू- नागरी उड्डाण मंत्रालय, जेपी नड्डा- आरोग्य मंत्रालय, सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग मंत्रालय, सी आर पाटील- जलशक्ती, किरण रिजीजू- संसदीय कार्यमंत्री, धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्री, अर्जुनराम मेघवाल- कायदा मंत्री, चिराग पासवान – क्रीडा मंत्री, अन्न प्रक्रिया मंत्री, प्रल्हाद जोशी – ग्राहक कल्याण मंत्रालय, गिरिराज सिंह – टेक्सटाइल मंत्रालय, ज्योतिरादित्य सिंधिया- सूचना आणि प्रसारण मंत्री, मनसुख मंडाविया- कामगार मंत्री, हरदीप सिंह पुरी- पेट्रोलियम मंत्री, एचडी कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री.