उत्तर महाराष्ट्रात 15 सप्टेंबरपासून पावसाचा अंदाज; 70 ते 130 मिलिमीटरची शक्यता

नाशिक (प्रतिनिधी): उत्तर महाराष्ट्रासाठी खूशखबर! हवामानशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, नांदेड, बीड, हिंगोलीमार्गे येणारा पाऊस उत्तर महाराष्ट्रात १५ ते १९ सप्टेंबरदरम्यान येण्याचा अंदाज आहे. तसेच या कालावधीत ७० ते १३० मिलिमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तर गेल्या २४ तासांत अवघे पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणामधून होणारा विसर्ग घटविण्यात आला आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उत्तर महाराष्ट्रात १०६.५ टक्के पाऊस झाला होता. आता ६५.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. १५ ते १९ सप्टेंबरदरम्यान पुणे-बेंगळुरू महामार्गाच्या पश्‍चिमेला घाट माथ्यावर पाऊस होण्याचा, तर पूर्वेकडे कमी पाऊस होण्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे.

याशिवाय २८ ते २९ सप्टेंबदरम्यान परतीच्या पावसाच्या ढगांमुळे ३ ते ५ ऑक्टोबरपर्यंत वळीव स्वरूपात पाऊस होण्याची शक्यताही हवामानशास्त्राच्या अभ्यासकांनी वर्तवली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६१.६ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी या कालावधीत १२५.७ टक्के पाऊस झाला होता.

तिसगाव, गिरणामध्ये कमी साठा:
जिल्ह्यातील २४ पैकी आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर, नांदूरमध्यमेश्‍वर ही धरणे भरली आहेत. मात्र तिसगावमध्ये २९, तर मालेगावसह खानदेशचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या गिरणामध्ये ५३ टक्के साठा झाला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ९५ टक्के साठा ठेवण्यात आला आहे.

गंगापूर धरणसमूहात ९०, पालखेड धरणसमूहात ९३, ओझरखेड समूहात ८०, दारणा समूहात ९३, गिरणा खोरे समूहात ७९ टक्के साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील टंचाईची परिस्थिती संपुष्टात येण्यासाठी आणखी पावसाची आवश्‍यकता आहे.

शिवाय द्राक्षांच्या ऑक्टोबर छाटणीला वेग येण्यासोबतच कांदा आणि भाजीपाला लागवडीसाठी आणखी पाऊस अपेक्षित असून, हवामानशास्त्र अभ्यासकांच्या अंदाजानुसार पाऊस होण्यातून रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790