कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या तीव्र चिंता निर्माण करत असून सध्याच्या स्थितीत सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या यादीत नाशिकचा देशातील पहिल्या १० शहरांत समावेश झाला आहे.
नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता काटेकोरपणे कोरोना निर्बंधाचे नियोजन केले जात असून, त्याचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारपासून (दि. १६) नाशिक शहरात मंगल कार्यालय आणि लॉन्सवर विवाह सोहळ्यास बंदी घातली आहे. तसे आदेशही जाहीर केले असून, यापूर्वी मंगल कार्यालयांमध्ये ५० व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह करण्यास परवानगी दिली होती. पण आता पुढील आदेशापर्यंत विवाह सोहळ्यावर बंदी घातली आहे.
यापूर्वी १५ मार्चपर्यंत मंगल कार्यालयांमध्ये ५० व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह करण्यास परवानगी दिली होती. आता विवाह करायचा असेल तर घरापुढे मंडप टाकून ५० व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी घेऊन करावा लागेल, असे आदेश जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिले आहेत. विवाहाचा यापुढे सोहळा करता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. जर ५० पेक्षा जास्त लोक विवाह समारंभात आढळले तर विवाहासाठी परवानगी मागणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.