नवी दिल्ली। दि. ७ जानेवारी २०२६: राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करताना मोबाइल नेटवर्क अचानक गायब होण्याचा त्रास प्रवाशांसाठी कायमचा डोकेदुखी ठरला आहे. या समस्येवर ठोस तोडगा काढण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) पुढाकार घेतला असून, देशभरातील महामार्गांवर एकूण १,७५० किलोमीटर अंतरावर असलेल्या ४२४ ठिकाणी मोबाइल नेटवर्क पूर्णपणे अनुपलब्ध असल्याचे ‘ब्लॅक स्पॉट्स’ म्हणून चिन्हांकित केले आहेत.
या ठिकाणी तातडीने नेटवर्क सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी एनएचएआयने दूरसंचार विभाग (डॉट) आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (ट्राय) हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. प्रवाशांच्या सोयीसह आपत्कालीन परिस्थितीत संपर्क तुटू नये, यासाठी ही सुधारणा अत्यावश्यक असल्याचे एनएचएआयने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, केवळ नेटवर्क सुधारण्यापुरतेच न थांबता प्रवाशांच्या सुरक्षिततेवरही एनएचएआयने विशेष भर दिला आहे. अपघातप्रवण भाग किंवा मोकाट जनावरांचा वावर जास्त असलेल्या क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी वाहनचालकांच्या मोबाइलवर ‘फ्लॅश एसएमएस’ किंवा अलर्ट पाठवण्याच्या सूचना ट्रायला देण्यात आल्या आहेत. या अलर्टमुळे वाहनचालकांना आधीच इशारा मिळणार असून, वेग नियंत्रणात ठेवून संभाव्य अपघात टाळण्यास मदत होणार आहे.
![]()


