नाशिक (प्रतिनिधी): कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेच्या सातपूर कॉलनी व गंगापूर येथील रुग्णालयांमध्ये मोफत आरटीपीसीआर स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे. नगरसेविका वर्षा भालेराव यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
अनेकजण रुग्ण पैशांअभावी तपासणी करण्याचे टाळतात. त्यामुळे निदान न होता आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो. हे टाळण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत आरटीपीसीआर स्वॅब तपासणी करण्याची मागणी नगरसेविका भालेराव यांनी केली होती.
गंगापूर व सातपूर कॉलनी येथील रुग्णालयांमध्ये पूर्णपणे ही चाचणी मोफत केली जाणार आहे. गंगापूर रोड परिसर, आनंदवली, गंगापूर गाव, ध्रुवनगर, शिवाजीनगर, श्रमिकनगर, धर्माजी कॉलनी, सोमेश्वरनगर,सातपूर गाव, एमआयडीसी परिसर, अशोकनगर, चुंचाळे, पिंपळगाव बहुला या भागात राहणाऱ्या नागरिकांची यामुळे सोय होईल. स्वॅब टेस्टिंग सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत असेल. ४८ तासानंतर रिपोर्ट मिळेल.