नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): इंडिगो कंपनीने हिवाळी सत्राचे वेळापत्रक जाहीर केले असून, त्यात नाशिक विमानसेवेच्या वेळांत बदल करण्यात आले आहेत. नवी दिल्ली व बेंगळुरू या नव्या सेवांची कंपनीने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. मात्र, नवी दिल्ली विमानतळ प्राधिकरणाकडून ‘स्लॉट्स’ उपलब्ध न झाल्याने ही विमानसेवा तूर्त तरी ‘अधांतरीच’ असल्याची स्थिती आहे.
नाशिकच्या ओझर विमानतळावरून सध्या केवळ ‘इंडिगो’ची सेवा सुरू असून, अहमदाबाद (दोन फ्लाइट्स), नागपूर, गोवा, इंदूर व हैदराबाद या पाच शहरांसाठी सेवा दिली जात आहे. तिला प्रवाशांकडून चांगला प्रतिसादही लाभत आहे.
नाशिकशी आणखी काही शहरे जोडली जाण्याची गरज असून, त्यासाठी उद्योजक व पर्यटन संस्थांकडून प्रयत्न सुरू होते. त्याला काही प्रमाणात यश येऊन २९ ऑक्टोबरपासून नवी दिल्ली व बेंगळुरू सेवा सुरू करण्याची घोषणा ‘इंडिगो’ने केली होती.
नवी दिल्ली-नाशिक-बेंगळुरू अशी ही नियोजित सेवा होती. तिचा हिवाळी सत्राच्या वेळापत्रकातही समावेश करण्यात आला होता. मात्र, नवी दिल्ली विमानतळ प्राधिकरणाकडून कंपनीला ‘स्लॉट्स’ उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे या सेवेसाठी नाशिककरांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, नव्या वेळापत्रकात नाशिकच्या सर्वच विमानांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाशिकला कोइम्बतूर, डेहराडून, श्रीनगरसह अधिकाधिक शहरांशी कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार असल्याचे उद्योजकांकडून सांगितले जात आहे.
विमानसेवेचे सुधारित वेळापत्रक, शहरे- नवीन वेळ:
- नाशिक-गोवा दुपारी १.०० ते २.३५
- गोवा-नाशिक दुपारी २.५५ ते ४.५०
- नाशिक-अहमदाबाद रात्री ९.२५ ते १०.५०
- अहमदाबाद-नाशिक रात्री ७.४० ते ९.०५
- नाशिक-अहमदाबाद दुपारी ११.०५ ते १२.३०
- अहमदाबाद-नाशिक सकाळी ९.१५ ते १०.३५
- नाशिक-नागपूर सकाळी ८.१० ते ९.५०
- नागपूर-नाशिक रात्री ७.०० ते ८.४५
- नाशिक-हैदराबाद सायंकाळी ५.२५ ते ७.१५
- हैदराबाद-नाशिक सकाळी १०.५० ते १२.३५
- नाशिक-इंदूर रात्री ९.०५ ते १०.१५
- इंदूर-नाशिक सकाळी ६.४५ ते ७.५०