नाशिक शहरात लागू असलेल्या निर्बंधांमध्ये सोमवार (दि. २८ जून) पासून महत्वाचे बदल करण्यात आले आहेत…
नाशिक (प्रतिनिधी): राज्यात कोरोनाच्या डेल्टा, डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंट्समुळे ४ ते ६ आठवड्यांत तिसरी लाट पसरण्याची दाट शक्यता आहे. हा धोका लक्षात घेता संपूर्ण राज्यात किमान तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू राहतील. ४ जूनला अनलॉकबाबत ५ टप्पेनिहाय नियमावली जारी करण्यात आली होती. त्यातील तिसऱ्या टप्याचे निर्बंध राज्यात लागू राहतील. त्याचप्रमाणे स्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना टप्प्यांत बदल करण्याचा अधिकार दिले आहेत.
त्यानुसार जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस या विषाणूचा संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेता, येत्या सोमवार पासून निर्बंधांमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. याआधी मॉल्स सुरु करण्यास परवानगी दिली होती. मात्र सोमवार पासून तर पुढील आदेश येईपर्यंत मॉल्स बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे याआधी शनिवार व रविवारी लग्न सोहळ्यांना दिलेली परवानगी आता रद्द करण्यात आली आहे. लग्न समारंभांचा हा नियम ५ जुलै पासून लागू होईल. म्हणजेच ५ जुलै पासून सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ वाजेपर्यंतच लग्न समारंभांना परवानगी असेल. अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी व रविवारी सर्व दुकाने, आस्थापना संपूर्णत: बंद राहतील. फक्त वैद्यकीय सेवा, मेडिकल दुकाने, दुध, वृत्तपत्र विक्री, भाजीपाला व फळांची दुकाने चालू राहतील. तसेच हॉटेल्स व फूड विक्रेते यांना फक्त होम डिलिव्हरीची परवानगी असेल.
दुसरी लाट ओसरली नाही; ९०% रुग्णांना डेल्टा व्हेरिएंटची बाधा:
केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितले की, देशात अद्यापही कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. देशात ७५ जिल्ह्यांत अजूनही संक्रमणाचे प्रमाण १० टक्क्यांहून अधिक, तर ९२ टक्के जिल्ह्यांत ५ ते १० टक्क्यांपर्यंत आहे. देशात नव्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण एकट्या डेल्टा व्हेरिएंटचे आहेत. एनसीडीसीचे संचालक सुजित सिंह म्हणाले, १८ जिल्ह्यांत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ५१ रुग्ण आढळले. महाराष्ट्रात सर्वाधिक २२ रुग्ण आहेत. राज्यात कोरोनाच्या अतिघातक डेल्टा प्लस या व्हेरिएंटच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू १३ जूनला झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील या ८० वर्षीय महिलेला इतरही आजार होते.