NCERT नं मोठा निर्णय घेतला आहे. आता NCERT च्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये इंडिया या शब्दाऐवजी भारत हा शब्द वापरण्यात येणार आहे.
यापुढे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCERT च्या पुस्तकात इंडिया हा शब्द दिसणार नाहीये या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द पुस्तकात असणार आहे. ‘भारत’ शब्दाच्या उल्लेखाच्या प्रस्तावाला NCERT ने मंजुरी दिली आहे.
NCERT नं पुस्तक निर्मितीसाठी 19 सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. NCERT पुस्तकात इंडिया या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरण्यात यावा, या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. आता NCERT पुस्तके छापली जातील तेव्हा या पुस्तकांमध्ये इंडिया या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरण्यात येणार आहेत. त्यासोबतच प्राचीन इतिहास (Asian History) या शब्दाच्या ऐवजी शास्त्रीय इतिहास (Classic History) हा शब्द वापरण्यात येणार आहे. आता NCERT च्या या निर्णयानंतर भारतातील इतर बोर्ड देखील हा निर्णय घेतील का? हे आता पहावं लागेल.
NCERT राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या अनुषंगाने शालेय पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासक्रमात सुधारणा करत आहे. अशातच आता NCERT नं त्यांच्या पुस्तकांमधील काही शब्द बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंडिया आणि भारत या नावांच्या उल्लेखांवर देशात वाद सुरु आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिनरचे निमंत्रण पाठवल्यानंतर देशाचे नाव बदलण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. या भोजन निमंत्रणात राष्ट्रपतींऐवजी (BHARAT) भारताचे राष्ट्रपती असे लिहिले होते. यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी मोदी सरकारला कडाडून विरोध करत प्रतिक्रिया दिल्या. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्र्यांना राजकीय वाद टाळण्याच्या सूचना दिल्या. G-20 शिखर बैठकीमध्ये PM मोदींच्या समोर लावलेल्या फलकावर INDIA ऐवजी इंग्रजीत BHARAT लिहिलेले दिसले.