नाशिक (प्रतिनिधी): चाडेगावची ग्रामदैवत काशाई देवीच्या यात्रोत्सवानिमित्ताने वर्गणीसाठी बैठक झाली. बैठकीनंतर चाडेगाव फाट्यावरील हॉटेलबाहेर एकाने गेल्यावर्षीच्या वर्गणीची शिल्लक रकमेची मागणी केली असता, ती न दिल्याने सराईत गुन्हेगाराने त्याच्याकडील पिस्तुलातून गोळी झाडली. यात गंभीर जखमी युवकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, संशयित पसार झाला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन मानकर, नाना हुळहुळे, महेंद्र मानकर, गोकुळ मानकर, सूरज वाघ, आकाश पवार, अमोल नागरे, सतिश सांगळे, नंदू नागरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर, गोळीबारात ज्ञानेश्वर प्रकाश मानकर (२८, रा. मानकर मळा, चाडेगाव, ता. नाशिक) हा युवक जखमी आहे. सदरचा प्रकार बुधवारी (ता. २४) रात्री साडेअकराच्या सुमारास चाडेगाव फाटा येथे झाला असून, मुख्य संशयित सराईत गुन्हेगार असून तो व जखमी चुलत भाऊ आहेत.
ज्ञानेश्वर मानकर यांच्या फिर्यादीनुसार, ग्रामदैवत काशाई देवी यात्रेनिमित्ताने संशयित सचिन मानकर याने गावातील मारुती मंदिरात बैठक बोलाविली असता, बहुतांशी ग्रामस्थांची अनुपस्थितीमुळे पुन्हा दुसऱ्या दिवशी बैठक घेण्याचे ठरले. त्यानंतर संशयित सचिन मानकर याने ज्ञानेश्वरला बळजबरीने त्याच्या फॉर्चूनर कारमधून संशयितांसह चाडेगाव फाट्यावरील हॉटेलमध्ये नेले.
तेथे जेवणं झाल्यानंतर संशयिताने ज्ञानेश्वरकडे गेल्या यात्रोत्सवातील शिल्लक वर्गणीतील २० हजारांची मागणी केली. ज्ञानेश्वरने नकार दिल्याने संशयित सचिन याने त्यास मारहाण केली आणि त्याच्या कमरेचे पिस्तुल काढून जीवे मारण्याची धमकी दिली. ते पाहून ज्ञानेश्वर पळू लागला असता, अन्य संशयितांनी त्यास पकडले.
तर, संशयित सचिन याने त्याच्याकडील पिस्तुलीतून झाडलेल्या दोन गोळ्या चुकविल्या तर तिसरी गोळी ज्ञानेश्वरच्या पाठीत घुसली. तशा अवस्थेत तो पळत जाऊन गोकूळ नागरे याच्या घरी गेला आणि आपबिती सांगितली. त्यास रुग्णालयात नेण्यासाठी दोघे निघाले असता, संशयित नागरेच्या घरासमोर पोहोचले. संशयितांनी त्यास बळजबरीने स्वत:च्या गाडीत बसविले आणि गंगापूर रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर संशयित पसार झाले.
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २३८/२०२४)