नाशिक (प्रतिनिधी): हिरावाडीतील गुंजाळबाबा नगर येथे पादचारी महिलेला अडवून दोघा भामट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करून तिच्या अंगावरील दागिने हातचलाखीने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
भारती लहेरीभाई सोलंकी (वय: ५०, रा. हिरावाडी) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता.४) सकाळी साडेसातच्या सुमारास त्या देवपूजा करण्यासाठी पायी जात होत्या. त्यावेळी गोविंदानंद अपार्टमेंटसमोर ३५ ते ४० वयोगटातील दोघा संशयितांनी त्यांना अडविले आणि “आम्ही पोलिस आहोत, पुढे चोरी झालेली आहे. तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा”, अशी बतावणी केली.
त्यावेळी भारती सोलंकी यांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवून हातातील सोन्याच्या बांगड्या आणि गळ्यातील सोन्याची चैन असा ८० हजार रुपयांचे दागिने काढत असताना संशयितांनी मदत करण्याचा बहाणा करीत त्यांच्या हातातील दागिने हातचलाखीने लंपास केले आणि दुचाकीवरून पसार झाले. काही वेळाने महिलेने त्यांच्याकडील दागिने पाहिले असता त्यांना ते मिळून आले नाहीत. याप्रकरणी पंचवटी पोलिसात अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (पंचवटी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४९१/२०२४)