मुंबई | २६ मे २०२५: राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून, हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या भागांसह सहा जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. सोमवार, २६ मे रोजी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत मेघगर्जनेसह वादळी वारे आणि अतिमुसळधार पाऊस होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई आणि ठाणे परिसरात पहाटेपासूनच पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मागील तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून, या भागातही पुढील काही तासांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील घाटमाथ्यांवरही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींसह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. नाशिक आणि परिसरातील घाटमाथ्यावरही जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्येही वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.