नाशिक। दि. १५ डिसेंबर २०२५: उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सियसने वाढ नोंदविण्यात आल्याने थंडीची तीव्रता काहीशी ओसरली आहे. राज्यात धुळे येथे सर्वात कमी म्हणजे ६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. निफाड तालुक्यातील रुई येथे तापमान ६.२ अंशांपर्यंत घसरले, तर नाशिक शहरात आज किमान तापमान ९.४ अंश सेल्सियस नोंदवले गेले.
दरम्यान, पुढील दोन दिवसांनंतर हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पश्चिमी चक्रवात सक्रिय होणे आणि उत्तर भारतातून थंड वारे वाहू लागल्याने राज्यात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. आगामी काळात वाढणाऱ्या थंडीमुळे द्राक्षबागांमध्ये ‘घड कूज’ या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. तसेच जळगाव आणि मालेगाव परिसरात दिवसाही गारठा जाणवण्याची शक्यता आहे.
तर, पाकिस्तानच्या दिशेने येणाऱ्या पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव सध्या काहीसा कमी झाल्याने किमान तापमानात तात्पुरती वाढ झाली आहे. मात्र १६ डिसेंबरनंतर पश्चिमी चक्रवाताचा परिणाम पुन्हा वाढून हवामानात बदल होईल आणि थंडीची तीव्रता वाढेल, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
![]()

