निफाडचे तापमान नीचांकी ४.२ वर
नाशिक (प्रतिनिधी): शहरात गुरुवारी सकाळी पारा १० अंशांवर घसरल्याने ऐन मार्चमध्ये हुडहुडी भरल्यासारखी स्थिती होती. मात्र दुपारी सूर्य आग ओकू लागल्याने पारा ३६ अंशांवर गेल्याने नाशिककरांना घाम फुटला होता. सकाळी सहा ते दुपारी तीनपर्यंत तापमानात तब्बल २६ अंशांचा फरक पडला होता. २०१५ नंतर दहा वर्षांनी अशी विचित्र स्थिती उद्भवली असून त्यावेळी पारा ८.१ अंशांवर घसरला होता.
बुधवारी पारा ३३.१ अंशांवर होता. २४ तासांत त्यात ३ अंशांनी वाढ झाल्याने गुरुवारी उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता. आगामी दोन दिवस सकाळी वातावरणात गारवा राहणार असून दुपारी काहीसा उकाडा जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणामध्ये दमट आणि उष्ण वाऱ्यामुळे उकाडा जाणवत आहे, तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यात उत्तरेकडील गार वाऱ्यांमुळे सकाळी तापमानात घसरण होत आहे. बुधवारी दुपारपासून वाऱ्याचा वेग वाढला आहे. सायंकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर गारवा अधिक जाणवत असल्याने आरोग्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
निफाडमध्ये २४ तासांत ७.४ अंशांची घसरण:
मार्चमध्ये एवढा पारा उतरत नाही. मागील वर्षी थंडीचे प्रमाण अधिक होते. तरीही मार्चमध्ये एवढे तापमान घसरल्याची नोंद झाली नाही. बुधवारी निफाडला किमान तापमान ११.६ होते. परंतु, २४ तासांत येथील पारा तब्बल ७.४ अंशांनी घसरला. – भरत मालुंजकर, केंद्रप्रमुख, गहू संशोधन केंद्र, कुंदेवाडी, निफाड
![]()


