नाशिक (प्रतिनिधी): गुजरातपासून ते राजस्थानपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांची भर पडली आहे. त्यामुळे आगामी १० दिवस राज्यात थंडीचे प्रमाण वाढणार आहे.
अवघ्या २४ तासांत राज्यातील सरासरी किमान तापमानात ३ ते ४ अंशांनी घसरण झाली असून शनिवारी सकाळी थंडीची तीव्रता वाढली होती. तर दिवसाही गार वारे वाहत होते. नाशिक येथे १४.६ तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १४ अंश किमान तापमानाची नोंद झाली असून धुळ्यात येथे नीचांकी ९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
राज्यात ९ जानेवारीपासून ते १७ जानेवारीपर्यंत दिवसा गारवा परंतु रात्री ऊबदारपणा जाणवत होता, मात्र, रविवारपासून आगामी १० दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत (दि. २८) किमान तापमानात ४ ते ५ अंश सेल्सिअसने घसरण होऊन ते सरासरी १० ते १२ अंशांपर्यंत स्थिरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील एकूण २३ जिल्ह्यांत थंडीचा प्रभाव अधिक राहणार आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत किमान तापमान सरासरीइतकेच राहणार असल्याने या ठिकाणी साधारण थंडी राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले.
… यामुळे पुन्हा थंडी:
समुद्रसपाटीपासून एक किलोमीटरवर गुजरातपासून ते राजस्थानपर्यंत सध्याचे कमी दाब क्षेत्र, उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात आणि अरबी समुद्रावरील आर्द्रतायुक्त वारे, ओरिसावरील उच्च दाबाचे क्षेत्र राजस्थान, मध्य प्रदेशाकडे सरकणे या तीन वातावरणाच्या प्रवाहांमुळे निर्माण झालेल्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांमुळे उत्तर भारतातील गारठा बिहार झारखंडमार्गे पूर्वेकडून महाराष्ट्रात खेचला जाणार असल्याने थंडी वाढणार आहे.